पुणे : सोशल मीडियावर गुंड रिल्स प्रसारीत करत आहे. त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे. एवढं करून कोणाची मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल. पुण्याचे पोलीस आयुक्त आज नाशिकमध्ये आहेत. यामुळे पुणे सीपी आणि पुणे ग्रामीण एसपी यांना सूचना दिल्या आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे लोहगाव येथील विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाने बांधलेल्या नवीन टर्मिनलची पाहणी अजित पवार यांनी केली. त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत अजित पवार म्हणाले, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिषेक आणि मॉरीस यांच्यात चांगला संवाद दिसतो. त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध दिसत होते. व्हिडिओ पाहिल्यावर मॉरीस गोळीबार करणार असे वाटत नाही. परंतु आरोपीच्या चेहऱ्यावर एक तर मनात वेगळे असा हा प्रकार आहे. आता या घटनेचा नीट तपास व्हायला हवा. या हत्येमागील खरं कारण समोर आले पाहिजे. आता विरोधक बिहारचे उदाहरण देणार पण मुंबईतील दोन्ही गोळीबाराच्या घटना जर बघितल्या तर वेगळ्या आहेत. पिस्तूल देताना सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत.
पहिली घटना मुळशीला घडली. ते गुंडच प्रवृत्तीचे होते. गुंडांनीच गुंडांचाच काटा काढला हे तर खरं आहे की नाही? का दुसरं कोणी आलं होतं? उल्हासनगरच्या बाबतीत जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब झाली. त्यांचे जमिनीच्या व्यवहारातून गोळीबार झाला. ते दोघेही निवांत पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. एक नागरिक म्हणून पोलिसांचं खरोखरच कौतुक केले पाहिजे. कारण आत गोळ्यांचा आवाज आल्यानंतर, एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील.. दुसऱ्याकडे (महेश गायकवाड) पण रिव्हॉल्वर होती. त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही. नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.