पुरंदरला विमानतळ उभे राहिले तर देशाचे नेक्स्ट डेस्टिनेशन पुणे असेल; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 09:20 AM2023-12-26T09:20:28+5:302023-12-26T09:21:25+5:30

पुरंदर विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी जातील ते समृद्ध हाेतील, शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात चांगले पॅकेज मिळेल

If the Purandarla airport remains standing the country next destination will be Pune; Faith of Devendra Fadnavis | पुरंदरला विमानतळ उभे राहिले तर देशाचे नेक्स्ट डेस्टिनेशन पुणे असेल; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुरंदरला विमानतळ उभे राहिले तर देशाचे नेक्स्ट डेस्टिनेशन पुणे असेल; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुणे: येत्या २० वर्षांतील देशाचे ग्रोथ इंजिन होण्याची क्षमता पुण्याची आणि पीएमआरडीएची आहे. जोपर्यंत पुण्याला नवे विमानतळ मिळत नाही, तोपर्यंत पुण्याचा विकास होणार नाही. पुणे येत्या काळात देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असेल. पुरंदर विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी जातील ते समृद्ध हाेतील. शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात चांगले पॅकेज मिळेल. पुरंदरला विमानतळ उभे राहिले तर देशाचे नेक्स्ट डेस्टिनेशन पुणे असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ या खासगी तत्त्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, दै.‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, दै. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, पीएमएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, ‘नव्या युगाचे उद्योग समाविष्ट करण्याची क्षमता असणारे हे शहर आहे. म्हणून रिंगरोडसारखे विकासाचे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे. पुण्याच्या विकासासाठी जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे. यामध्ये कोणतेही राजकारण न करता देशाच्या विकासासाठी नव्या विमानतळाची गरज आहे.’

पत्रकारांसाठी गृहकर्जाच्या व्याजात सबसिडी

महापालिका आणि पीएमआरडीएने नियमात बसवून घरांच्या किमती कमी करण्याबाबत विचार करावा. मीडिया टॉवरसाठी जागा मिळविणे महत्त्वाची बाब असून, महसुली मुख्यालयी असे प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, त्यासाठी माझ्या खात्याचा स्वतंत्र अधिकारी असेल. पत्रकारांना स्वस्तातील घरे मिळावीत यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

यावेळी ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे म्हणाले, पत्रकारांसाठीचा हा गृहप्रकल्प प्रेरणादायी असून, पत्रकारांचा एक स्वतंत्र टॉवर असावा, हे स्वप्न पाहणे आणि ते पूर्णत्वास नेणे कौतुकास्पद आहे. कोटीच्यावर लोकसंख्या असलेल्या पुण्यात पत्रकारांना घरे मिळत नाहीत, पण अशा खासगी तत्त्वांवरील गृहप्रकल्पांमुळे पत्रकारांचे घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

Web Title: If the Purandarla airport remains standing the country next destination will be Pune; Faith of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.