...आता सगळं नशिबाच्याच हवाल्यावर
By Admin | Updated: September 4, 2015 02:02 IST2015-09-04T02:02:58+5:302015-09-04T02:02:58+5:30
दुष्काळ आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे... माणसं कशीही जगतील... पण मुक्या जनावरांचं काय...त्यांना ना चारा ना पाणी...जिवापाड संभाळेलेल्या जनावरांची हाडं वर आली

...आता सगळं नशिबाच्याच हवाल्यावर
चंद्रकांत साळुंके, काऱ्हाटी
दुष्काळ आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे... माणसं कशीही जगतील... पण मुक्या जनावरांचं काय...त्यांना ना चारा ना पाणी...जिवापाड संभाळेलेल्या जनावरांची हाडं वर आली... त्यामुळे चारा डेपो सुरू करा म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना रोज विनवण्या केल्या... आंदोलने केली मात्र त्यांच्या कानापर्यंत आवाजच पोहोचेना... आता सगळं नशिबाच्याच हवाल्यावर सोडावं लागणार... अशी व्यथा बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी मांडली.
सलग चार वर्षांपासून पावसाच्या कमतरतेने खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावरांच्या चाऱ्याची पिके घेतली नसल्याने शेतकऱ्यांना जिवापाड संभाळलेली जनावरे कसे जगवायची, या विचारात शेतकरी पडला आहे. काऱ्हाटी, बाबुर्डी, पानसरेवाडी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव क .प. देऊळगाव रसाळ आदी भागांत भीषण पाणीटंचाई आहे. (वार्ताहर)
पावसाचे ३ महिने उलटले, तरी पाऊस पडेना; बहुतांश विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. असणारे पाणी क्षारयुक्त असल्याने नाइलाजास्तव जनावरांना पिण्याचे पाणी म्हणून पाजावे लागत आहे. हंगामातील बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, कांदा पिके वाया गेली आहेत.
आजअखेर जनावरांना चारा विकत आणावा लागत आहे. साठवलेला चारा संपल्याने सर्व काही नशिबाच्या हवाल्यावर असल्याचे शेतकरी बोलत आहेत. निदान जनावरांचा चारा प्रश्न सुटला असता, तरी शेतकरी हतबल झाला नसता. शेती ओस पडली आहे. पिण्यास पाणी नाही. शेतीवर कर्ज काढले आहे. परतफेड कशी करायची. गोठ्यातील जनावरे उपाशीपोटी कशी ठेवायची. त्यांना पोटभर चारा कसा द्यायचा, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे असल्याचे शेतकरी शिवाजीराव वाबळे यांनी सांगितले.
आवाक्याबाहेरील दराने शेतकरी हतबल
बागायती भागातून जिरायती भागातील शेतकरी जनावरांचा चारा विकत घेत आहेत. मात्र, ऊस उत्पादक उसाचे दर चढ्या भावाने लावत आहेत. एका गुंठ्याला पाच ते सहा हजार रुपये बाजारभावाने ऊस विक्री सुरू आहे. या आवाक्याबाहेरील दराने जिरायती भागातील शेतकरी हतबल झाला आहे. जनावरांना चारा कसा द्यायचा. पैसे कोठुन आणायचे, अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.