धर्मादाय कार्यालयाकडून मदतीचा आदर्श पॅटर्न
By Admin | Updated: May 19, 2015 01:06 IST2015-05-19T01:06:26+5:302015-05-19T01:06:26+5:30
धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने अनाथ, मतिमंद, गरीब मुलांच्या संगोपनासाठी काम करणाऱ्या ३ संस्थांना ३० लाखांची मदत मिळवून दिली आहे.

धर्मादाय कार्यालयाकडून मदतीचा आदर्श पॅटर्न
पुणे : धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने अनाथ, मतिमंद, गरीब मुलांच्या संगोपनासाठी काम करणाऱ्या ३ संस्थांना ३० लाखांची मदत मिळवून दिली आहे. न्यासाकडे जमा झालेला पैसा पडून न राहता तो गरजू संस्थांपर्यंत पोहोचविण्याचा आदर्श पॅटर्न धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी घालून दिला आहे.
अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या खर्चासाठी दारोदार भटकावे लागत असताना धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने स्वत:हून लाखो रुपयांची देणगी दिल्याने संस्थाचालकांना सुखद धक्का बसला आहे. ‘लोकमत’मधील एका लेखामध्ये अमरावती येथील मतिमंद मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेची माहिती आली होती. त्याआधारे माहिती घेऊन या संस्थेस ५ लाख, सातारा येथील एहसास मंतिमंद मुलांचे बालगृह या संस्थेस २० लाख व म्हसवडच्या द्रोणागिरी शिक्षण संस्थेस ५ लाख अशी ३० लाखांची महत्त्वपूर्ण मदत करण्यात आली आहे.
कराड येथील मारुती देव ट्रस्ट या ट्रस्टला मंदिराच्या जीणोद्धारासाठी पैशांची आवश्यकता होती, त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यांनी जमिनीची विक्री करण्याचा प्रस्ताव पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. या संस्थेला किती रकमेची आवश्यकता आहे याची माहिती सहधर्मादाय आयुक्तांनी घेतली. त्यानुसार ७५ लाख रुपयांची गरज असल्याचे मारुती देव ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन या जमिनीची विक्री केली असता ट्रस्टच्या जमीन विक्रीतून १ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम मिळाली. ट्रस्टच्या आवश्यकतेनुसार त्यांना ७५ लाख रुपये देण्यात आले. उर्वरित ३० लाख रुपयांची रक्कम ही धर्मादाय न्यासाच्या बँक खात्यात पडून राहिली असती. मात्र या रकमेचा सामाजिक कार्यासाठी सदुपयोग व्हावा याकरिता शिवकुमार डिगे यांनी पुढाकार घेतला.
अनाथ, मतिमंद मुलांच्या संगोपनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, त्यांच्या संगोपनासाठी मोठा खर्च येत असताना त्यांना मिळणारी मदत तोकडी पडत असल्याची माहिती डिगे यांना मिळाली होती. ‘लोकमत’मधील एका लेखामध्ये अमरावती येथील परतवाडाच्या गोपाला शिक्षण संस्थेची व त्यांच्या कामाची माहिती आली होती. त्याची खातरजमा करून या संस्थेला ५ लाखांचा धनादेश देण्यात आला. सातारा येथील एहसास संस्थेच्या कामाची त्यांनी माहिती घेतली. संस्थेच्या उभारणीकरिता त्यांना पैशांची मोठी गरज असल्याने त्यांना २० लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला. तसेच सातारा येथील द्रोणगिरी संस्थेस ५ लाखांची मदत त्यांनी केली.
पडून राहण्यापेक्षा गरजंूना मदत
‘‘मंतिमंद, बेवारस व दुर्लक्षित मुलांसाठी तिन्ही संस्था काम करीत आहेत, या संस्था कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय चालविल्या जात आहेत. न्यासास मिळणारा पैसा हा सामाजिक कामासाठी वापरला जावा, ज्या संस्था समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करतात अशा संस्थांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या कामाबाबत प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ही रक्कम न्यासाच्या बँक खात्यामध्ये पडून राहिली असती. परंतु, या रकमेचे वाटप झाल्यामुळे मुलांच्या संगोपनासाठी ती उपयोगी पडणार आहे. न्यासाच्या रकमेचा यापेक्षा चांगला वापर झाला असता असे मला वाटत नाही,’’ असे धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिलेल्या निकालपत्रामध्ये नमूद केले आहे.