पुणे : प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा पुण्यात निसर्ग कार्यालय येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो असल्याचे पवार यांनी सांगितले असल्याचे गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गायकवाड म्हणाले, रविवारी जी घटना घडली ती घडल्यापासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार मला सातत्याने फोन करत आहेत. माहिती घेत आहेत. शरद पवार साहेबांनी अनेक कॉल केले होते. सध्याची परिस्थिती योग्य नाही काळजी घे असं सांगितलं होतं. दोन ते तीन वेळा साहेबांनी फोन केला होता. आज पुण्यात साहेबांची भेट घेऊन घडलेल्या सगळा प्रकार सांगितला माझा जो संशय की मला मारण्याचा कट होता आहे तो देखील सांगितला. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक काटे त्यांच्यासोबत असायचे. दीपक काटे बावनकुळे यांना गॉडफादर मानतात. गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी माझी अपेक्षा असल्याचे साहेबांना सांगितलं आहे. सध्याची परिस्थिती जी आहे अनेकांवर असे निशाणे साधले जाऊ शकतात अशी माहिती मी पवार साहेबांना दिली. संपूर्ण परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. संपूर्ण प्रकरणाची माहिती मी घेत आहे. माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो असं साहेबांनी सांगितलं. पोलिसांनी सहकार्य केलं नाही म्हणून मी आता पोलीस संरक्षण घेणार नाही असे मी साहेबांना सांगितलं आहे. अनेक मंत्री पोलिसांवर दबाव ठेवून आहेत. दोन दिवसात दीपक काटे यांना सोडून द्या असं अनेक मंत्र्यांनी पोलिसांना सांगितला आहे.
दीपक काटेवर कारवाई व्हायला हवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्रीही आहेत. बावनकुळे व आरोपी दीपक काटे यांचे संबंध दाखवणारे पुरावे समोर आले. तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे त्यातून स्पष्ट दिसते आहे. आता त्याच्यावर कारवाई होईल हे पाहण्याची जबाबदारी फडणवीस यांचीच आहे. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, या आक्षेपात काहीही अर्थ नव्हता. समाजातील कोणाही विवेकी व्यक्तीच्या ते लक्षात येईल. तरीही त्यांचे म्हणणे समजून घेऊन आम्ही त्यांना या बदलातील तांत्रिक अडचण सांगितली होती. पण तरीही हल्ला करण्यात आला. सोलापूरमधील ज्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी या हल्ल्याची दखल घेतली नाही, हेही दु:खद असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी किमान या घटनेची फिर्याद द्यायला हवी होती.