"कुणीतरी ओरडलं ही बेकरी मुस्लिमाचीच आहे. पण, ती आमची आहे आणि आमच्याकडे मुस्लीम कामगार आहेत. त्यातून त्यांनी बेकरीवर दगडफेक केली. पत्रे काढली आणि आग लावली." हे म्हणणं आहे यवतमध्ये हिंसाचाराची जळ बसलेल्या स्वप्निल अदिनाथ कदम यांचं. कदम हे बेकरी प्रोडक्ट तयार करण्याच्या उद्योगात आहेत. त्यांच्याकडे मुस्लीम मजूर कामाला आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दौंड तालुक्यातील यवतमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली. यामुळे यवतमधील तणाव वाढला.
दगडफेक, जाळपोळ
शुक्रवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. जमलेला जमाव अचानक हिंसक झाला आणि दुसऱ्या धर्मियांच्या प्रार्थना स्थळाकडे निघाला. त्याचवेळी वाटेत कदम यांची बेकरी दिसली. मुस्लीम व्यक्तीची बेकरी समजून जमावाने तिला आग लावली.
कामगार मुस्लीम, पण बेकरी माझी
स्वप्निल कदम म्हणाले, "माझ्याकडे काही कामगार मुस्लीम आहेत. ते उत्तर प्रदेशातील आहेत. सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. मुस्लीम व्यक्तीने ही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केली असल्याचे म्हटले गेले. इथून १५०-२०० मीटर मशीद आहे. जमाव मशिदीकडे निघाला होता."
"तिकडे जात असताना कुणीतरी ओरडले की, ही बेकरी मुस्लीम व्यक्तीची आहे. पण, बेकरी तर आमची आहे. त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी पत्रे काढली. त्यानंतर ज्वलनशील पदार्थ आतमध्ये फेकले. आमची बेकरी जळून खाक झाली. सोशल मीडियावरील पोस्टशी आमच्या मजुरांचा काहीही संबंध नव्हता", असे कदम म्हणाले.