महिला पोलीस अधिकाऱ्यासह पतीला हडपसरमध्ये मारहाण
By Admin | Updated: June 12, 2017 01:43 IST2017-06-12T01:43:33+5:302017-06-12T01:43:33+5:30
गाडी व्यवस्थित चालवायला सांगितल्याच्या रागामधून महिला सहायक निरीक्षकासह तिच्या पतीला मारहाण करण्यात

महिला पोलीस अधिकाऱ्यासह पतीला हडपसरमध्ये मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गाडी व्यवस्थित चालवायला सांगितल्याच्या रागामधून महिला सहायक निरीक्षकासह तिच्या पतीला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर येथील रामटेकडीमध्ये शनिवारी संध्याकाळी घडली. या महिला अधिकाऱ्याला अश्लील शेरेबाजीही करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना गजाआड केले आहे.
सचिन राजेंद्र देडगे (वय २८, रा. वाल्मीकीवस्ती, रामटेकडी), शुभम भाऊसाहेब क्षीरसागर (वय २२, रा. प्रथमा बिल्डिंग, रामटेकडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झालेल्या दोन महिला पसार झाल्या आहेत. याप्रकरणी सहायक निरीक्षक महिलेने फिर्याद दिली आहे. शनिवारी त्या पतीसह कामानिमित्त शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बाहेर जात होत्या. त्या वेळी त्यांच्या गाडीला एक टेम्पो आडवा आला.
फिर्यादींनी टेम्पोचालकाला गाडी व्यवस्थित चालवा असे सुनावले. त्यावर चिडलेल्या देडगे आणि क्षीरसागर यांनी फिर्यादीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. यावर त्यांनी आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतरही दोघांनी अश्लील शेरेबाजी सुरुच ठेवली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पतीला आरोपींनी दोन महिलांच्या मदतीने मारहाण केली. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांना गजाआड केले असून दोन महिला मात्र पसार झाल्या.