पतीकडून गरोदर पत्नीची हत्या; नंतर आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:59 IST2019-02-21T00:59:42+5:302019-02-21T00:59:58+5:30

पिरंगुट येथील घटना : शस्त्राने केले वार

Husband murders wife; Then suicides | पतीकडून गरोदर पत्नीची हत्या; नंतर आत्महत्या

पतीकडून गरोदर पत्नीची हत्या; नंतर आत्महत्या

पौड : पिरंगुट येथे असलेल्या सुनील विलास शिंदे (वय ३३) याने घरगुती भांडणातून आपल्या गरोदर असलेल्या पत्नीवर शस्त्राने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर सुनील यानेही स्वत:लाही भोसकून घेत स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. २०) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. सुनील शिंदे याचे मूळ गाव मुळशी तालुक्यातील पिंपळोली असून त्याचा पिरंगुट येथे वाहनांच्या बॅटरी विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्यानिमित्ताने तो पिरंगुट येथे राहत होता. मागील एक वर्षापूर्वीच त्याचे अनिताबरोबर लग्न झाले होते. लग्नापूर्वी त्याने पिरंगुट येथे स्वत:चा फ्लॅट विकत घेतला होता. दोघे नवरा-बायको या नवीन घरात वास्तव्यास होते.

सकाळी घरात असताना नवरा-बायकोमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. आतून दार लावून हे भांडण सुरू असताना त्यांच्या पत्नीला तो मारहाण करून तिच्यावर हल्ला केल्यानंतर ती गॅलरीत येऊन ‘मला वाचवा मला वाचवा’ अशी ओरडू लागली. त्यावेळी त्या इमारतीत राहणारे लोक शिंदे यांच्या घराच्या दिशेने पळाले; परंतु दरवाजा आतून बंद असल्याने कोणालाच काही करता येईना. शेजारील नागरिक दारात उभे राहून आवाज देत असताना आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने ती माहिती पोलिसांना कळविल्यावर घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याअगोदरच दोघांचीही प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपासणीसाठी मृतदेह ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते करीत आहेत.

Web Title: Husband murders wife; Then suicides