मानवता हाच खरा धर्म !

By Admin | Updated: November 30, 2015 01:59 IST2015-11-30T01:59:14+5:302015-11-30T01:59:14+5:30

धर्मात राजकारणाचा प्रवेश झाला की विद्वेश निर्माण होतो, माणसा-माणसांत वैराची भावना निर्माण होते, शत्रुत्व निर्माण होते.

Humanity is the true religion! | मानवता हाच खरा धर्म !

मानवता हाच खरा धर्म !

पुणे : धर्मात राजकारणाचा प्रवेश झाला की विद्वेश निर्माण होतो, माणसा-माणसांत वैराची भावना निर्माण होते, शत्रुत्व निर्माण होते. कुठल्याही धर्मग्रंथात दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. मानवता हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक अब्दुल कादीर मुकादम यांनी केले.
‘वारजे विकास कृती समिती’तर्फे रविवारी राष्ट्रीय एकात्मता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘असहिष्णुता व दहशतवाद’ या विषयावर मुकादम बोलत होते. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख भानुप्रसाद बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजक नगरसेवक दिलीप बराटे, नुरुद्दिन पटेल, बाबा खान व्यासपीठावर होते.
मुकादम म्हणाले, सुशिक्षित तरुणांना संमोहित करून दहशतवादी कृत्याला बळी पाडले जात आहे. दहशतवादी कृत्याला तरुण बळी पडणार नाही, यासाठी समाजानेच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टींचा केवळ निषेध करून थांबविता येणार नाही. पाश्चात्य देशातील आणि भारतातील दहशतवादी कृत्यांबाबत वेगवेगळा विचार करावा लागेल. भारतातील दहशतवादाला पाकिस्तानचे पाठबळ मिळत आहे. कुवेत, दुबई, इराक, तुर्कस्तान, इराणच्या मनात अमेरिकेविषयी प्रचंड राग आहे. त्याचे कारण तेलसाठ्याचे राजकारण आहे. या राष्ट्रांना दावणीला बांधण्याचा अमेरिकेचा डाव आहे. इराक अमेरिकेला बळी न पडल्याने इराकला नेस्तनाबूत करण्यात आले. वास्तविक, इराकमधून एकही दहशतवादी तयार झालेला नाही.
भारतासमवेत युद्ध करू शकत नाही, हे पाकिस्तानला माहीत असल्याने छुपे युद्ध खेळले जात आहे. दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांचा धर्मपालनाचा अधिकार काढून घेण्यासाठी जागतिक पातळीवर कायदा केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सहिष्णुता आणि असहिष्णुता यातील फरकही त्यांनी विषद केला.
दहशतवादाचा निषेध करीत समतेचा संदेश देणारे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. दिलीप बराटे यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
नवाज खान, हमीद शेख, सचिन दांगट, नूर सय्यद, मदिन खान, आलम पठाण, दत्ता झंजे आदी उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Humanity is the true religion!