पुणे : तळेगाव - चाकण महामार्गावरील खालुंब्रे ता.खेड ) गावच्या हद्दीतून दुचाकीवरून कंपनीत कामावर जाणाऱ्या मनुष्यबळ विकास अधिकाऱ्याचा अवजड कंटेनरच्या खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (दि.१४) सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. गजानन बाबुराव बोळकेकर (वय.२६ वर्षे,रा. बोलका,ता.कंधार,जि.नांदेड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
विजय शंकरराव तंतरपाळे ( वय.२४ वर्षे,रा. चाकण ) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद अरमान कमरुददीन खान (वय,३० वर्षे,सध्या रा.धारावी मुंबई,मुळ रा.पूरेबक्श छताईडीह पोस्ट राणीजोत ता.तुलसीपुर,जि.बलरामपूर ) या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य गायकवाड (वय.२३ वर्षे,सध्य रा.येलवाडी,मुळ रा.साऊर,ता.भातकुली,जि.अमरावती ) आणि गजानन बोळकेकर हे दुचाकी वरून सकाळी ( दि.१४ ) ला सकाळी पावणे सात खालुंबे गावच्या हद्दीतील हुंडाई चौकाजवळ कंपनीत कामावर जात होते. मोहम्मद खान हा आपल्या ताब्यातील कंटेनर मुंबईकडून चाकण बाजूकडे भरधाव वेगात घेऊन जात होता. रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन ओव्हरटेक करताना दुचाकीस धडक दिली. यामुळे दुचाकी घसरून पडल्याने दुचाकीच्या मागे बसलेले गजानन हे कंटेनरचे पाठीमागील चाक आल्याने त्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचालक आदित्य गायकवाड हे जखमी झाले आहेत.
अक्षरशः त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा
तळेगाव - चाकण हा मार्गावर अरुंद रस्ता, सततची वाहतूक कोंडी आणि मार्गावर पडलेल्या बेसुमार खड्ड्यातून प्रवास करणे लोकांच्या जीवावर बेतत आहे. आजचा बळी हा त्यामधील एक आहे. गजानन यांना कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने त्यांनी आदित्य यांच्याकडे लिफ्ट मागवून ते कंपनीत जात होते. परंतु ते कंपनीत पोहचलेच नाही कारण दुर्दैवाने त्यांचा अपघातात बळी गेला. अपघात इतका भीषण होता की गजाजन हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने अक्षरशः त्यांचा शरीराचा चेंदामेंदा झाला होता.
३ महिन्यापूर्वी झाले होते लग्न
गजानन बोळकेकर चाकण एमआयडीसीच्या पानसे ऑटो कॉम युनिट या कंपनीमध्ये एचआर म्ह्णून कार्यरत होते. अपघाताच्या दिवशी कंपनीत जायला उशीर झाल्याने त्यांनी लिफ्ट मागितली होती. परंतु काळाचा घाला झाला अन् ट्रेलरखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ३ महिन्यापूर्वीच गजानन यांचे लग्न झाले होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.