...आता जगायचं कसं?
By Admin | Updated: August 18, 2015 03:45 IST2015-08-18T03:45:37+5:302015-08-18T03:45:37+5:30
माळरानावर चारा नाही... शेतात पाणी नाही... बागायती भागात रानं मोकळी नाहीत... पूर्वीसारखं मेंढरं घेऊन कोकण अथवा बागायती भागाकडे जावं तर

...आता जगायचं कसं?
लोणी भापकर : माळरानावर चारा नाही... शेतात पाणी नाही... बागायती भागात रानं मोकळी नाहीत... पूर्वीसारखं मेंढरं घेऊन कोकण अथवा बागायती भागाकडे जावं तर मुलांच्या शिक्षणाचं काय? घरातील वृद्ध व्यक्तींची हेळसांड होते. दिवसेंदिवस पाऊस-पाणी कमी होतोय. त्यामुळे शेती उजाड तर माळरानावर चारा नाही. पूर्वी मेंढरांवर उदरनिर्वाह व्हायचा. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या याच व्यवसायात राहिलो. त्यातून शिक्षण घेतलं नाही. आता सततची चारा व पाणी टंचाई; बागायती भागात उसाखालील क्षेत्र वाढले. त्यामुळे मेंढरं सांभाळणे जिकिरीचे होत आहे. शिक्षण नाही, इतर कला नाही. त्यामुळे आता जगायचं कसं?... ही व्यथा आहे बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील मेंढपाळ दत्तू मासाळ, शिवाजी मासाळ यांची. बारामतीच्या जिरायती भागातील मासाळवाडी, पळशी, मुढाळे, मोराळवाडी, कानाडवाडी, मोढवे, जोगवडी, तरडोली या वढाणे, बाबुर्डी या भागात मेंढपाळांची मोठी संख्या आहे. मागील चार वर्षे पावसाने ओढ दिल्याने येथील मेंढपाळांपुढे चारा व पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
यापूर्वी उन्हाळयातील महिना दोन महिने जाणवणारी टंचाई मागील काही वर्षांपासून पावसाळ्यातही जाणवू लागली आहे. पूर्वी या भागातील मेंढपाळ उन्हाळ्यात दोन महिने चाऱ्यासाठी मेंढरांसह कुटुंबे घेऊन कोकण, उत्तर महाराष्ट्रात जात असत. पावसाळा सुरू होताच गावाकडे परतत असत. कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने व गावाकडील शेती करता येत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत मेंढपाळवर्ग या व्यवसायात टिकून होता.
मागील काही वर्षात पावसाचे प्रमाण घटले. त्यातच पुण्या- मुंबईकडील भांडवलदारांनी जिरायती भागातील पडीक जमिनी घेऊन तारेची कंपाऊंड घातली. तर बागायती भागात उसाखालील क्षेत्रात वाढ झाली. याबरोबरच शासनाच्या सामाजिक वनीकरणाचा जाच वाढत राहिल्याने मेंढरांना चरण्यासाठी क्षेत्रच उरले नाही. स्वत:च्या शेतात चारा करावा, तर पाऊस नाही. विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे मेंढरांना सध्या टँकरने विकत घेऊन घमेल्यात पाणी पाजावे लागत असल्याची खंत पळशी येथील मेंढपाळ रामा माने, मुढाळे येथील अण्णा ठोंबरे यांनी व्यक्त केली.
शिक्षण घेतलेली पिढी या व्यवसायातून बाहेर पडेल. परंतु, ती संख्या अल्प आहे. शिक्षणाअभावी हा व्यवसाय करणाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. मेंढपाळ व्यवसाय केवळ कोरडवाहू भागात आहे. मात्र, तेथील शेती पाण्याअभावी पडीक आहे. मेंढरांची खांड घेऊन बाहेर पडावे तर मुलांच्या शिक्षण थांबते, अशा कात्रीत मेंढपाळवर्ग सापडल्याची व्यथा मासाळवाडी येथील मेंढपाळांनी व्यक्त केली.
(वार्ताहर)