मंचर रुग्णालयात रुग्णाची हेळसांड
By Admin | Updated: October 28, 2015 01:12 IST2015-10-28T01:12:49+5:302015-10-28T01:12:49+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासी रुग्णांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट प्रतीची सेवा व दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात

मंचर रुग्णालयात रुग्णाची हेळसांड
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासी रुग्णांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट प्रतीची सेवा व दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्यामुळे आदिवासी भागातील रुग्णांच्या आरोग्याची या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मारुती धोंडू केंगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डोंगरदऱ्यांमध्ये आदिवासी लोक राहतात. या भागात छोटी-छोटी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. किरकोळ आजारांसाठी या आरोग्य केंद्रांमध्ये प्रथमोपचार केले जातात. या भागात राहणाऱ्या आदिवासी जनतेची आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती आहे. आपल्या पोटाची खळगी भरता-भरता या भागातील आदिवासी बांधवांच्या नाकी नऊ येतात, तर मोठ्या आजारांच्या उपचारांसाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न आदिवासी जनतेला भेडसावत आहे. या रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतूने मंचर येथे कोटी रुपये खर्च करून भव्य उपजिल्हा रुग्णालय उभारले. मात्र या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. आदिवासी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण व परिसरातील जनता या रुग्णालयाकडे धाव घेते; परंतु या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार हे अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरून निकृष्ट पद्धतीची सेवा व अरेरावीच्या भाषेत दुय्यम दर्जाची वागणूक देत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आदिवासी भागातील ज्येष्ठ आदिवासी नेते मारुती धोंडू केंगले यांना आला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे या गावात राहणारे शंकर काळू केंगले यांना तीन दिवसांपूर्वी अचानक गुचकी व कमरेला जीव नसल्याचा त्रास जाणवू लागला. शंकर केंगले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले; परंतु त्यांना काही फरक न पडल्यामुळे अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील कर्त्या पुरुषाला होणाऱ्या त्रासामुळे संपूर्ण कुटुंब हादरले. आदिवासी नेते मारुती केंगले यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वत:हून तातडीने रुग्णाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हालविले. परंतु, तेथे वैद्यकीय अधिकारी गणेश पवार यांनी रुग्णाला न तपासता त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली. तसेच त्यांच्यावर उपचार न झाल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल व्हावे लागले. (वार्ताहर)