स्त्रियांमध्ये हार्मोन्स असंतुलनाचे प्रमाण वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:08+5:302021-09-02T04:25:08+5:30
मधुमेह, तणाव, विचित्र जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हार्मोन असंतुलनाची समस्या आढळून येते. रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या हार्मोन्स ...

स्त्रियांमध्ये हार्मोन्स असंतुलनाचे प्रमाण वाढतेय
मधुमेह, तणाव, विचित्र जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हार्मोन असंतुलनाची समस्या आढळून येते. रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे हाडांचा ठिसूळपणा, हृदयविकाराचा झटका आणि निराशा अशा समस्यांचे प्रमाण वाढते. अशा काळात हॉर्मोनल आणि त्यासंबंधीच्या चाचण्या करून घेऊन वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे असते.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निकिता सोमण म्हणाल्या, ‘स्त्रियांमध्ये ॲस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, थायरोक्झिन, प्रोलॅक्टिन आणि कोर्टिसोल संप्रेरकांच्या पातळीमधील चढ-उतार दिसून येतो. बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, लठ्ठपणा, थायरॉईड आदींमुळे महिलांना हार्मोन असंतुलन समस्यांचा सामना करावा लागतो. हार्मोनल असंतुलनामुळे पीसीओडी आणि वंध्यत्वासारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. उपचाराबरोबरच, पुरेशी झोप घेणे, रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे, संतुलित आहाराचे सेवन आणि वजन वाढू न देणे अशा प्रकारे जीवनशैलीत सुधारणा करणे गरजेचे ठरते.’
शरीरात हॉर्मोन्समध्ये झालेले बदल सुधारण्यासाठी हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देण्यात येते. महिलांमध्ये मेनोपॉजमध्ये होणारे बदल अथवा इतर समस्यांमुळे एखाद्या परिस्थितीत महिलांचे अंडाशय काढून टाकावे लागते. अशा वेळी ॲस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाहीत. ॲस्ट्रोजेनचे प्रमाण वाढल्यास त्यांना डिप्रेशन, चिंता, झोप न येणे या समस्या निर्माण होतात. थायरॉईड ग्रंथीचे कार्य बिघडल्यामुळे महिलांना उदासीन वाटते. साखरेचे पदार्थ खाण्याची इच्छा वाढते आणि वजन वाढू लागते. अशा महिलांना हॉर्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी घेण्याची गरज असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
------------------
काय काळजी घ्यावी?
- थायरॉईड, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन आणि कोर्टिसोलची पातळी तपासण्यासाठी रक्ताच्या चाचण्या करून घ्याव्यात.
- लोहाची कमतरता ओळखण्यासाठी सीबीसीसारखी चाचणी करावी.
- थायरॉईड, प्रोलॅक्टिन, कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन डी, रक्तातील ग्लुकोज आणि कॅल्शियमची पातळी तपासणे आवश्यक ठरते.
- महिलांनी वयाच्या २० व्या वर्षांपासूनच पॅप स्मिअर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. वर्षातून एकदा असे सलग ३ वर्षे करा आणि नमुना नकारात्मक असेल तर आपण ६५ वर्षांपर्यंत दर ३ वर्षांनी अशी तपासणी करून घ्या.
- महिलांनी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करावी.
-----------------
लक्षणे :
* राग येणे किंवा चिडचिडपणा करणे
* झोप कमी होणे आणि थकवा जाणवणे
* नेहमीपेक्षा जास्त घाम येणे
* जास्त भूक लागणे किंवा भूक कमी होणे
* स्मरणशक्ती कमी होणे
* पिंपल्स येणे