पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकातील अडथळे दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 02:35 PM2023-11-04T14:35:30+5:302023-11-04T14:36:28+5:30

ऐतिहासिक, पर्यटनाच्या दृष्टीने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राेवला जाणार आहे...

Honor in Pune's veins! Barriers removed from Bhide Wada National Monument | पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकातील अडथळे दूर

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकातील अडथळे दूर

पुणे : सांस्कृतिक, ऐतिहासिक वैभव लाभलेल्या पुण्याने शिक्षण, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही जगात वेगळे स्थान मिळवले आहे. देशात मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचा मानही पुण्याचाच. महात्मा जाेतिबा फुले आणि क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांनी हे क्रांतिकारक पाऊल टाकले हाेते. फुले दाम्पत्याने मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ताे भिडे वाडा आता राष्ट्रीय स्मारक हाेणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात हाेणार आहे. यामुळे ऐतिहासिक, पर्यटनाच्या दृष्टीने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राेवला जाणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या अगदी समोरच हा भिडे वाडा आहे. तात्यासाहेब भिडे यांनी शाळेसाठी फुले दाम्पत्याला जागा दिली आणि १ जानेवारी १८४८ राेजी तेथे मुलींच्या पहिल्या शाळेचा श्रीगणेशा झाला आणि सावित्रीच्या लेकींसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. ही वास्तू म्हणजे पुणेकरांसाठी श्रद्धास्थान आहे. मात्र, आजची भिडे वाड्याची स्थिती पाहिली तर या शाळेचा इतिहासाच जणू पुसला गेल्याची जाणीव हाेते. पण सर्वाेच्च न्यायालयाने जागेचा वाद साेडविला आणि राष्ट्रीय स्मारकाचा अडथळा दूर झाला. आता भिडे वाड्याची ही वास्तू पुन्हा दिमाखात उभी राहणार आहे. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

पुण्याच्या भूमीत जुन्या ऐतिहासिक वास्तूंना हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे पण भारतात सर्वप्रथम मुलींसाठी पुण्यातील ज्या वास्तूत ही शाळा सुरू झाली तो भिडे वाडाच कायम दुर्लक्षित राहिला. ही वास्तू विस्मृतीत गेल्याने या शाळेची ओळख जवळपास पुसली गेली. बुधवार पेठेतील गजबजलेल्या ठिकाणी हा भिडे वाडा उभा आहे. वाड्याच्या समोरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि डाव्या बाजूला दत्त मंदिर आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर फुलं विक्रेत्यांसह इतर विक्रेत्यांनी वेढलेला आहे. मात्र, मुलींची पहिली शाळा कुठे आहे? असे विचारले तर कुणालाच सांगता येणार नाही अशी स्थिती आहे.

काही वर्षांपूर्वीच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले; पण सावित्रीच्या लेकींनाच भिडे वाडा कुठे आहे याची माहिती नाही. मात्र, भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने आता जुन्या ऐतिहासिक स्मृतींना पुन्हा उजाळा मिळणार आहे. मुलींची शाळा सुरु करण्यासाठी फुले दाम्पत्याने अनेक दगड-धोंडे सोसले. त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे.

या वास्तूचा राष्ट्रीय स्मारकाच्या रूपात पुनर्विकास केला जाणार आहे. भिडे वाड्यातील मुलींची शाळा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीने २००४ पासूनच जोर धरला होता. सामाजिक संघटनांनी अनेक आंदोलने केली. राजकीय दबाव देखील टाकण्यात आले. अखेर हा प्रश्न सुटला आहे.

Web Title: Honor in Pune's veins! Barriers removed from Bhide Wada National Monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.