सहा महिन्यातच २७,५०० कोटी रुपयांची घर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST2021-09-21T04:12:37+5:302021-09-21T04:12:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर क्षेत्रात जानेवारी-जुलै २०१९ मध्ये ४९ हजार तर जानेवारी-जुलै २०२१ मध्ये ५३ हजार ...

सहा महिन्यातच २७,५०० कोटी रुपयांची घर विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर क्षेत्रात जानेवारी-जुलै २०१९ मध्ये ४९ हजार तर जानेवारी-जुलै २०२१ मध्ये ५३ हजार घरांची विक्री झाली. घर विक्रीत टक्क्यांची वाढ झाली. जानेवारी-जुलै २०१९ या कालावधीत साडेएकवीस हजार कोटी रुपयांची घरे विकली गेली. जानेवारी-जुलै २०२१ या काळात साडेसत्तावीस हजार कोटी रुपये मूल्याच्या घरांची विक्री झाली. विक्री मूल्यातली वाढ तब्बल २७ टक्के आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या ३८ व्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आलेल्या ‘पुणे हाैसिंग रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या या अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक अतुल गाडगीळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे, सचिव अरविंद जैन, उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आदी उपस्थित होते.
“विक्री मूल्यातली वाढ ही आकाराने मोठ्या असलेल्या घरांच्या खरेदीमुळे झाली आहे. याबरोबरच पुण्याचा वायव्य भाग म्हणजेच हिंजवडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर,सूस, बालेवाडी सोबत पिंपरी चिंचवड येथील घरांच्या खरेदीला ग्राहकांची पसंती आहे,” असे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. पुणे महानगर क्षेत्रातील बांधकाम क्षेत्राचा विचार करता जानेवारी ते जुलै २०१९ व २०२१ दरम्यान विक्री झालेल्या घरांची संख्या, आकार आणि किमती यावर अहवालात भर देण्यात आला आहे.
अनिल फरांदे म्हणाले, “२०१९ व २०२१ चे आराखडे आशावादी आहेत. वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे तयार केलेल्या या अहवालाचा उपयोग पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना भविष्यात यशस्वी प्रकल्प उभारणीसाठी निश्चित होईल.” दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या घरांची विक्री ही जानेवारी ते जुलै २०१९ दरम्यान १ हजार २५० कोटी रुपये इतकी होती. हीच विक्री जानेवारी-जुलै २०२१ दरम्यान २ हजार ३५० कोटी रुपये इतकी झाली. त्याचाच अर्थ मोठ्या आकारातील सदनिकांची विक्री ही ८८ टक्के म्हणजेच दुपटीच्या जवळपास वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
चौकट
क्रेडाई अहवाल सांगतो
-७० लाखांहून कमी किंमत असलेल्या घरांची विक्री ही जानेवारी-जुलै २०१९ मध्ये ६९ टक्के होती. तीच विक्री जानेवारी-जुलै २०२१ मध्ये घटून ६३ टक्के झाली.
-हिंजवडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस बालेवाडी या वायव्य पुण्याच्या भागात गृहखरेदीला ग्राहकांकडून पसंती मिळत असून जानेवारी-जुलै २०२१ मध्ये या भागात तब्बल ७ हजार १६० कोटी रुपये किंमतीच्या घरांची विक्री झाली. शहरातील एकूण विक्रीच्या २६ टक्के विक्री याच एकट्या भागात झाली आहे. याखालोखाल पिंपरी-चिंचवड भागात २३.५ टक्के इतकी विक्री झाली.