पुणे: रिक्षाचालकांविरोधात तक्रारीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइन क्रमांकावरून आलेल्या तक्रारीवरून रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारल्याच्या आहेत. तक्रारीनंतर आतापर्यंत ६५ रिक्षाचालकांना नोटिसा काढल्या आहेत.
शहरात रिक्षाने प्रवास करताना बऱ्याच वेळा त्यांच्या उद्धटपणाचा अनुभव नागरिकांना येतो. पण, त्यांच्याबाबत तक्रार कुठे करायची, असा प्रश्न प्रवाशांसमोर होता. आरटीओमध्ये जाऊन अथवा ई-मेलद्वारे तक्रार करता येणे शक्य होते. परंतु तक्रार करण्याची प्रक्रिया किचकट होती. त्यामुळे आरटीओने रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केला. या क्रमांकावर गेल्या काही महिन्यांत रिक्षाचालकांच्या १३५ तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर गैरवर्तनाच्या तक्रारी, जास्त पैसे घेणे अशा तक्रारी असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आतापर्यंत ६५ रिक्षाचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
हेल्पलाइनवरून रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्याची सोय आरटीओने दिली आहे. त्यावर काही तक्रारी येत आहेत. तसेच, रिक्षाचालकांबाबत बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आरटीओकडून रिक्षाचालकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये तपासणी करून सर्व प्रकारची कारवाई केली जाणार आहे. - स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
अशी आहे आकडेवारी
एकूण तक्ररी - १३५
भाडे नाकारल्याच्या सर्वाधिक तक्रारी - ६५