असा ओळखा कोकणचा राजा ! समजून घ्या रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस मधला फरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:06 IST2018-04-25T20:25:12+5:302018-04-25T21:06:32+5:30
आंबा आवडत नाही असा माणूस विरळच. पण त्यातही हापूस आंबा असेल तर मात्र सोने पे सुहागाच ! मात्र हल्ली अनेकदा कर्नाटक हापूस दाखवून ग्राहकांना रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो.ही फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स

असा ओळखा कोकणचा राजा ! समजून घ्या रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस मधला फरक
पुणे : उन्हाळा आला की आठवत ते रणरणतं ऊन, शाळेच्या सुट्ट्या आणि आंबे. महाराष्ट्रातल्या कोणाचंच बालपण याशिवाय गेलेलं नाही. पण जसजसा काळ बदलला तसतशी सुट्ट्यांची समीकरणही बदलली. आणि त्यासोबत बदललेली अजून एक गोष्ट म्हणजे आंबा.
आंब्याची क्रेझ जरी कायम असली तरी कोकणातल्या हापूसचे घटते उत्पादन आणि कर्नाटकने हापूस उत्पादनात मारलेली बाजी यामुळे अनेकदा हापूस घेताना फसवणूक होते.याबाबत पुण्यातले व्यापारी रोहन उरसळ यांनी बोलताना सध्या महाराष्ट्रातील हवामानाच्या बदलामुळे आंब्याचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबरकर्नाटक भागातही महाराष्ट्रातल्या हापूसची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे अनेकदा या दोन हापूसमधील फरक ओळखू येत नाही असेही ते म्हणाले. ग्राहकांनी नक्की कोकणातला लाडका रत्नागिरी हापूस कसा ओळखायचा याच्या त्यांनी दिलेल्या खास टिप्स.
१) रत्नागिरीचा हापूस आंबा कापल्यावर केशरी दिसतो. कोणतीही पिवळेपणाची झाक त्यावर नसते.
२) कर्नाटक हापूस किंवा इतर आंब्यात केशरीपणा असला तरी त्याचा सुगंध हा रत्नागिरी हापूस इतका गोड येत नाही, शिवाय त्यात अनेकदा पिवळटपणाची झाक दिसते.
३)रत्नागिरी हापूस आंबा तयार झाल्यावर त्याच्यावर सुरकुत्या पडतात.
४)कर्नाटक हापूस आंबा तयार झाल्यावरही कडकच असतो तर तो अधिक पिकायला लागला तर मात्र देठापासून काळा पडतो.
५)सर्वातमहत्वाचा फरक म्हणजे कर्नाटक हापूसची साल ही जाड असते.
६)रत्नागिरी हापूस आंब्याची साल पातळ असते. देवगडची तर इतकी पातळ असते की ते आंबे मार्च आणि एप्रिलपर्यंतची उष्णता सहन करू शकतात. नंतर ते अनेकदा खराब होत असल्याने बऱ्याचवेळा मे महिन्यात देवगड हापूस उपलब्ध नसतात.
७)रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी अठरा ते वीस इंच इतकी असते.
८)कर्नाटक हापूसची पेटी मात्र त्यापेक्षा लहान असून ती चौदा ते पंधरा इंचाची होती.
९)कर्नाटक हापूसला तितकासा सुगंध येत नसून रत्नागिरी हापूसचा मात्र गोडसर घमघमाट सुटतो.
१०)रत्नागिरी हापूस पिवळा आणि काहीवेळा हिरवट असतो. मात्र अनेकदा लाल मातीतील लागवडीमुळे कर्नाटक हापूसवर लालसर ठिपके येतात.