जाचक रूढीपरंपरेच्या ‘जटे’तून तिची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 07:56 PM2018-10-12T19:56:24+5:302018-10-12T20:00:53+5:30

गेल्या दहा वर्षांपासून तिच्या डोक्यावर वाढलेली जट इतरांपेक्षा तिचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुरेशी होती...

Her liberation from 'jata' | जाचक रूढीपरंपरेच्या ‘जटे’तून तिची मुक्तता

जाचक रूढीपरंपरेच्या ‘जटे’तून तिची मुक्तता

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे जिल्हयात सर्वाधिक जट निर्मुलन : देवाच्या नावाने घातलेली भीती प्रमुख कारणसाधारण तीन वर्षांपासून ते तब्बल ५० वर्षांपर्यंत जट ठेवण्याचे प्रमाण सर्व जातींच्या महिलांचा समावेश असून सध्या त्यातील ३२ महिलांचे समुपदेशन सुरूधार्मिक परंपरेच्या चौकटीत कित्येक शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांचा समावेश

युगंधर ताजणे 
 पुणे : एकदा तिच्या अंगात आलं; मग सगळ्यांचे प्रश्न सुटतील. भक्तांच्या अडीअडचणींना धावून येण्याकरिता तिनं हे  रूप धारण केलं आहे. साक्षात देवी तिच्या माध्यमातून बोलत असल्याने जे काही प्रश्न असतील ते विचारा, असे सांगून दोन तास तिच्याभोवती वाजवणं सुरू होतं. काही करून अंगात वारं घ्या, असं तिला सांगण्यात आलं.  गेल्या दहा वर्षांपासून तिच्या डोक्यावर वाढलेली जट इतरांपेक्षा तिचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुरेशी होती. रूढीपरंपरेच्या जोखडात अडकलेल्या अशा ७९ महिलांचे जट निर्मूलन अंनिसच्या वतीने करण्यात आले आहे. 
देवाच्या नावाने मनात घालण्यात आलेली मानसिक भीती हे जट ठेवण्यामागील प्रमुख कारण असल्याचे जट निर्मूलनाकरिता पुढाकार  घेतलेल्या अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव सांगतात. तर, काही जण पैसे कमावण्याच्या हेतूने हा उद्योग करीत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत सर्वाधिक जटनिर्मूलन पुणे जिल्ह्यात झाले आहे. साधारण तीन वर्षांपासून ते तब्बल ५० वर्षांपर्यंत जट ठेवण्याचे प्रमाण आहे. यातील अनेकांची जट ही पंधरा, वीस, बावीस वर्षांनी कापून टाकण्यात आली आहे. जट कापण्यात आलेल्या महिलांमध्ये सर्व जातींच्या महिलांचा समावेश असून सध्या त्यातील ३२ महिलांचे समुपदेशन सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या महिलांचे जट निर्मूलन करण्यात आले, त्या आर्थिकदृष्ट्या सधन असल्याचे पाटील सांगतात. शिक्षणामुळे विचारात परिवर्तन होते, असे म्हटले जात असले, तरी धार्मिक परंपरेच्या चौकटीत कित्येक शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलादेखील अडकल्या आहेत. यात आयटी इंजिनिअर, एका बँकेतील महिला अधिकारी आणि मुंबईतील उच्च न्यायालयात काम करणाऱ्या महिलेने जट ठेवली होती. 
शिकलेल्या व पुढारलेल्या समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन अद्याप झालेले नाही. एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन संस्था जटनिर्मूलनाचे काम करीत असताना अनेक ब्यूटी पार्लरमधील महिला या जटाधारी महिलांची जट कापण्यास तयार होत नाहीत. ‘हे देवाचं काम आहे. त्याचा कोप होईल. त्यामुळे आम्ही ही जट कापणार नाही,’ अशी भूमिका त्या महिला घेत असल्याने प्रश्न आणखीच गंभीर होत आहे. ज्या वेळी एखाद्या महिलेची जट कापण्यासाठी जातो, तेव्हा त्या महिलेची मानसिक तयारी  करावी लागते. तिच्या मनातील भीती देवाविषयीची भीती दूर करावी लागते. ‘जट कापल्यामुळे जे काय नुकसान होणार आहे, ते माझे होऊ द्या. जो त्रास होईल, तो माझ्या वाट्याला देवाने द्यावा,’ असे म्हणून जट कापण्याचे काम केल्याचे नंदिनी जाधव सांगतात.

*  देवाच्या नावाने म्हणून पाच वर्षांपासून जट ठेवली होती. या जटेमुळे कुठे घराबाहेर पडणे, तसेच घरगुती कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे अवघड जात असे. डोक्यावरील जट मोठ्या प्रमाणात वाढल्याने केस दिसतच नसायचे. पुढे जाधव यांच्याशी बोलल्यानंतर जट काढण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी देवाच्या नावाने जी भीती घालण्यात आली होती ती जट काढल्याने ती दूर झाली. पुरेशा जनजागृतीनंतर परिसरातील आणखी एका मुलीचीदेखील जट काढण्यात आली. या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली. देवाचा कुठलाही कोप झालेला नाही. - राजश्री भोईटे, आर्वी (जटनिर्मूलन करण्यात आलेली महिला)


 

Web Title: Her liberation from 'jata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.