... म्हणून शिवछत्रपती हे एकच नाव निघते; शरद पवारांनी सांगितलं शिवरायांचं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 03:27 PM2023-06-06T15:27:48+5:302023-06-06T15:34:06+5:30

पुण्यातील लाल महाल येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी प्रमुख उपस्थिती होती.

... Hence Sivachhatrapati turns out to be a single name; Sharad Pawar told Shiv Raya's 'reason' | ... म्हणून शिवछत्रपती हे एकच नाव निघते; शरद पवारांनी सांगितलं शिवरायांचं राज'कारण'

... म्हणून शिवछत्रपती हे एकच नाव निघते; शरद पवारांनी सांगितलं शिवरायांचं राज'कारण'

googlenewsNext

पुणे - रायगडावार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. तर सोशल मीडियावरही शिवराज्याभिषेक निमित्त उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यातील लाल महाल येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी, शिवछत्रपतींच्या कार्याची महती सांगत, शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत, ज्यांनी कधीही त्यांच्या नावानं राज्य चालवलं नाही. महाराजांचं राज्य हे कधीही भोसल्याचं राज्य नव्हतं तर ते हिंदवी स्वराज्य आणि रयतेचं राज्य होतं, असे शरद पवारांनी म्हटलं. 

पुण्यातील लाल महाल येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, त्यांनी लाल महालात हा कार्यक्रम होणे हेही ऐतिहास असल्याचे म्हटले. तसेच, आजचा दिवस महाराष्ट्रच नाही तर देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा शिवछत्रपतींचे स्मरण आपण करत आहोत. त्यांनी स्वराज्य उभे केल्यावर राज्यकारभार स्वीकारला तो दिवस हा आजचा दिवस आहे. कारभार स्वीकारला पण राज्य कोणासाठी करायचे? तर राज्य हे सर्वसामान्यांसाठी करायचे, ही राज्यातील जनतेची शक्ती, आणि सत्ता ही जनतेसाठी वापरायची हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्यापुढे ठेवले. त्याचे स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. 

या देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांचा इतिहासही आहे. पण साडेतीनशे वर्षे झाल्यानंतर सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यावर देशातील राजांपैकी शिवछत्रपती हे एकच नाव निघते. त्याचे कारण त्यांनी कधीच राज्य त्यांच्यासाठी चालवले नाही. देशात अनेकांची नावे घेता येतील ज्यांनी राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चालवले. यात एकच शिवछत्रतींचा अपवाद होता. त्यांनी कधीही भोसले यांचे राज्य केले नाही, तर हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य तयार केले. राज्य हे रयतेसाठी चालवायचे, हा आदर्श त्यांनी संपूर्ण देशासमोर ठेवल्याचे पवार यांनी सांगितले.

सत्ता ही कशी वापरावी, कोणासाठी वापरावी याचाही आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला. शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका किंवा सोन्याच्या नांगराचा फाळ देण्याचा विचार असो.. शेवटच्या माणसाला सन्मानाने जगण्यासाठी, त्याला पुढे नेण्यासाठी जे काही लागेल ते देण्यासाठी सत्ता, असे त्यांचे सूत्र होते. म्हणून त्यांनी कष्टाने, घामाने, त्यागाने, शौर्याने राज्य प्रस्थापित केले. ते राज्य ग्रहण करण्याचा ऐतिहासिक सोहळा झाला. काही घटकांनी त्याला वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. पण या देशातील सामान्य माणसाने पहिल्यांदा आपला राजा हा सत्तेवर बसलेला पाहिला. त्याचा सन्मान, त्याचे स्वागत ही भूमिका अंत:करणापासून स्वीकारल्याचं पवार म्हणाले. 

दरम्यान, जनतेच्या अंत:करणात स्थान प्राप्त करून घेणारे असे आदर्श राजे आणि त्यांच्या सत्ताग्रहणाचा आनंद सोहळा विशेषत: लाल महालात होतोय यालाही एक इतिहास आहे.

Web Title: ... Hence Sivachhatrapati turns out to be a single name; Sharad Pawar told Shiv Raya's 'reason'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.