कष्टकरी महिलांना ‘कर्ते’पणाची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:08+5:302021-03-09T04:12:08+5:30
पुणे : पालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विधवा साहाय्य योजनेअंतर्गत दिली जाणारी १५ हजार रुपयांची मदत कष्टकरी महिलांच्या मृत्यूपश्चात ...

कष्टकरी महिलांना ‘कर्ते’पणाची मदत द्या
पुणे : पालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विधवा साहाय्य योजनेअंतर्गत दिली जाणारी १५ हजार रुपयांची मदत कष्टकरी महिलांच्या मृत्यूपश्चात दिली जावी, अशी मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीने महिला व बालकल्याण समितीकडे करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत नवऱ्याच्या मृत्यू पश्चात पत्नीला एकदा १५ हजार रुपये दिले जातात. या रकमेतून पतीच्या मृत्यूनंतर महिलेला काही उद्योग सुरू केला जावा अशी अपेक्षा असते. कष्टकरी महिला आपले कुटुंब जगवीत असतात. ही ‘कर्ती बाई’ वारली तर तिच्या मुलांना काहीच मिळत नाही. ह्याचे कारण, महिला रोजगार, नोकरी अथवा व्यवसाय करत असल्या तरी त्यांना समाजात कर्तीचा दर्जा दिला जात नाही. कर्ता म्हटले की समाजासमोर पुरुषांचे चित्र पुढे येते.
परंतु, कष्टकरी बाया या कर्त्या असतात. त्यांनी कष्ट केले नाहीत तर कुटुंब जगणार नाही. कचरा उचलणे, काच, पत्रा, भंगार गोळा करणे, घरकामगार आदी कष्टाच्या कामामध्ये असलेल्या महिलांचे श्रम पुरुषांच्या श्रमामध्येच मोजले जातात. ऊसतोड मजुरांचा अर्धा कोयता, वीटभट्टी आणि बांधकामामध्ये जोडप्याचा सहभाग अशी अनेक उदाहरणे आहेत.
त्यामुळे कष्टकरी महिलांचा मृत्यू झाल्यास त्यांचे कर्तेपण मान्य करून त्यांच्या मुलामुलींना विधवा साहाय्य योजनेतील रक्कम दिली जावी, अशी मागणी पंचायतीने केली आहे. संघटनेच्या सभासदांनी पालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यांना यासंदर्भात मागणीचे निवेदन दिल्याचे संघटनेच्या पौर्णिमा चिकरमाने यांनी सांगितले.