महिलांनी महिलांसाठी उभारावेत मदतीचे पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:15 IST2021-09-16T04:15:14+5:302021-09-16T04:15:14+5:30

सामाजिक जीवनात विविध क्षेत्रातील महिलांशी चर्चा करताना मला एक गोष्ट नेहमी जाणवते. एक महिला म्हणून आपण कमी आहोत, ...

Help bridges for women | महिलांनी महिलांसाठी उभारावेत मदतीचे पूल

महिलांनी महिलांसाठी उभारावेत मदतीचे पूल

सामाजिक जीवनात विविध क्षेत्रातील महिलांशी चर्चा करताना मला एक गोष्ट नेहमी जाणवते. एक महिला म्हणून आपण कमी आहोत, ही न्यूनगंडाची भावना अद्यापही अनेक जणींमध्ये आहे. या भावनेवर मात करत सळसळत्या ऊर्जेने काम करत अनेक जणींनी आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. परंतु, आपल्या सगळ्याच भगिनींना ही संधी मिळत नाही. सामाजिक, आर्थिक परंपरांच्या बेड्या त्यांना पुढे जाण्यापासून रोखतात. त्यांच्यासाठी इतर महिलांनी मदतीचे पूल उभारण्याची गरज आहे. ग्रॅव्हिटिएस फाऊंडेशनच्या वतीने आम्ही हे काम करत आहोत. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.

सध्याची सामाजिक परिस्थिती पाहिल्यावर अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरच काय घरातही मुली सुरक्षित नाहीत, हे दाखविणाऱ्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. पुण्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पोटच्या मुलीवर जन्मदात्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले होते. या प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून ग्रॅव्हिटिएस फाउंडेशनने गेल्या काही वर्षांपासून आम्ही ‘गुड टच, बॅड टच’ ही चळवळ सुरू केली. सामाजिक कार्यकर्ते आणि समुपदेशक यांच्या एक्स्पर्ट टीम तयार केल्या. त्या निमित्ताने मी अनेक शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या. पुण्यात महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील तब्बल सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या विषयासंदर्भांत जागरूक केले आहे.

यातून मुलींमध्ये आत्मविश्वासाची नवी भावना आम्ही तयार करू शकलो. मला आनंद आहे की, आमच्या या चळवळीला राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही बळ दिले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे याबाबतचा सरकारी निर्णय प्रसिद्ध केला आहे.

दिल्लीत घडलेल्या निर्भया दुर्घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेसाठी चेंजमेकर हा उपक्रम हाती घेतला. पुणे विद्यापीठ आणि कमिशनर ऑफ पोलीस, पुणे यांच्या सहभागाने १७४ कॉलेजमधील तब्बल दोन हजार विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक सुरक्षेचं प्रशिक्षण देण्यात आले. हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणावर राबिवण्याची गरज गेल्या काही दिवसांतील घटनांनी जाणवली आहे. सामाजिक असमानता, अत्याचार समाजातील सर्व स्तरांत असल्याचे त्यावेळी दिसून आले. आर्थिक परिस्थितीशी त्याचा संबंध नसतो. त्यामुळेच वेगवेगळ्या व्यासपीठांवर एकत्र होऊन महिलांनीही आपली आत्मपरीक्षण करत सर्वांना सोबत घेऊन पुढे जायला हवे. अन्यायाविरुध्द उभ्या ठाकलेल्या महिलांना बळ देण्याची गरज आहे. संघटनाद्वारे त्याला चळवळीचे रुप द्यायला हवे.

- उषा काकडे

अध्यक्ष, ग्रॅव्हिटिएस फाउंडेशन

Web Title: Help bridges for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.