प्राधिकरणाच्या वसाहतीत नरक यातना
By Admin | Updated: April 7, 2016 00:38 IST2016-04-07T00:38:47+5:302016-04-07T00:38:47+5:30
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी विकसित होत असताना कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीयांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली

प्राधिकरणाच्या वसाहतीत नरक यातना
विश्वास मोरे, पिंपरी
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी विकसित होत असताना कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीयांना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. गृहप्रकल्प उभारले. मात्र, त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. वसाहती समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, वसाहतींच्या देखभाल-दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे येथील रहिवाशांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत.पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी विकसित होऊ लागल्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १४ मार्च १९७२ ला झाली. पुढील ५० वर्षांतील होणारी लोकसंख्या वाढ विचारात घेता सुनियोजित शहर म्हणून प्राधिकरण उदयास आले. मूळ उद्देशापासून प्राधिकरण दूर गेले आहे, हे ढळढळीत वास्तव नाकारता येणार नाही. नवनगरसाठी प्राधिकरणाने चिंचवड, थेरगाव, काळेवाडी, वाकड, आकुर्डी, रावेत, तळवडे, चिखली, भोसरी, निगडी आदी १० गावांतील सुमारे १८४० हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात आले. आराखडा तयार केला. मात्र, हा आराखडा गेल्या ४० वर्षांत पन्नास टक्केही पूर्ण झालेला नाही. सुरुवातीला जागा विकण्याबरोबरच गृहनिर्माणाचे धोरण प्राधिकरणाने अवलंबिले. एकूण ४६ पेठा विकसित करण्याचे धोरण तयार केले. त्यानुसार या शहरातील नागरिकांना सात हजार रहिवासी भूखंडाचे वाटप केले. यमुनानगर, निगडी, कृष्णानगर, वाकड, काळेवाडी, थेरगाव अशा भागात
एकूण ३४ गृहयोजना राबविल्या. त्यातून सुमारे ११ हजार २२१ सदनिकांचे वाटप करण्यात आले.
प्राधिकरणाने काही इमारती स्वत: बांधून संबंधित संस्थांना हस्तांतरित केल्या. गेल्या २० वर्षांत बांधलेल्या बहुतांश गृहप्रकल्पांची अवस्था दयनीय झाली आहे. प्राधिकरणाने बांधलेल्या इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे.(क्रमश:)
वसाहतींचे काम निकृष्ट दर्जाचे
गृहयोजनेस प्रतिसाद मिळत नसल्याने प्राधिकरणाने सुरुवातीच्या कालखंडात कंपन्यांना आवाहन केले. त्यानुसार टेल्को, कुपर, सेंच्युरी एन्का, थरमॅक्स अशा विविध कारखान्यांतील कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्या अस्तित्वात आल्या. यातील काही सोसायट्या कंपन्यांनी, तर काही सोसायट्या प्राधिकरणाने बांधून दिल्या. अशा एकूण १०० सोसायट्यांना ५० हेक्टर जमीन दिली. प्राधिकरणाने बांधून दिलेल्या सोसायट्यांची अवस्था पाहण्यासारखीच आहे. निकृष्ट कामामुळे या घरात राहणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सर्वसामान्यांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वसाहतींची अवस्था दयनीय झाली आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, वसाहतींच्या देखभाल दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वसाहती समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. वसाहतींच्या सद्य:स्थितीचे चित्रण करणारी वृत्तमालिका आजपासून देत आहोत.