पुणे :पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर ५ हजार ८२२ हरकती आणि सूचना आल्या आहेत. या हरकती सूचनांवरील सुनावणी राज्यसरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यापुढे येत्या ११ ते १२ सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटाला प्रभाग रचना अनुकूल झाल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने सोयीस्कर प्रभाग रचना केल्याचा राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितल्याने राजकीय हस्तक्षेप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत असूनही त्यांना या प्रभाग रचनेत फटका बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेनेच्या ठाकरे गटाने या प्रारूप रचनेवर हरकती नोंदविल्या आहेत.
प्रभाग रचनेमुळे अनेक माजी नगरसेवक हरकती सूचना नोंदविण्यासाठी सरसावले होते. त्यात अनुकूल असलेला भाग जोडावा, प्रतिकूल असलेला भाग काढून टाकावा, गल्ल्यांऐवजी मुख्य रस्त्यांवरून प्रभागाची सीमा निश्चित करावी, यांसह इतर हरकती घेतल्या गेल्या आहेत. या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी पालिकेने वेळापत्रक तयार केले आहे. त्यात पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते २९ मध्ये आलेल्या हरकतींची सुनावणी ११ सप्टेंबर रोजी १० ते सायंकाळी ६ या वेळेत, तर प्रभाग क्रमांक ३० ते ४१ मध्ये आलेल्या हरकती आणि सूचनांची १२ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.