- विक्रम मोरे पुणे - लष्कर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्याला बाहेरील नागरिकांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांनी काम बंद आंदोलन पुकारले.या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली.
काय घडले नेमके?गेल्या रात्री १० वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या पुरुष वॉर्डाच्या बाहेर काही युवक आपापसात मारामारी करत होते. तेथील कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावरच हल्ला करण्यात आला. या युवकांनी संबंधित कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी ८ वाजता सर्व आरोग्य कर्मचारी एकत्र येत काम बंद आंदोलन सुरू केले.मोर्चा काढत कर्मचाऱ्यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी ठिय्या मांडला. पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांनी घेतला आंदोलनाचा मार्ग पटेल रुग्णालयात यापूर्वी अनेकदा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून दमदाटी आणि वादाच्या घटना घडल्या आहेत. मात्र मारहाणीचा हा पहिलाच प्रकार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यांनी हल्लेखोर युवकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.