‘तो’ खून प्रेमाच्या त्रिकोणामधून
By Admin | Updated: March 3, 2015 01:14 IST2015-03-03T01:14:59+5:302015-03-03T01:14:59+5:30
मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेलेल्या मित्राचा खून प्रेमाच्या त्रिकोणामधून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

‘तो’ खून प्रेमाच्या त्रिकोणामधून
पुणे : मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेलेल्या मित्राचा खून प्रेमाच्या त्रिकोणामधून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मैत्रिणीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी धायरीमधील बेनकर वस्तीमधील एका सदनिकेत हा खून झाला होता. चक्कर येऊन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची बतावणी केली होती. परंतु हा खून असल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालामधून स्पष्ट झाले होते. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करीत हा गुन्हा उघडकीस आणला.
अंकिता मनीष माने (वय २३) हिच्यासह तिचा प्रियकर स्वप्निल संदीप जाधव (वय २२, रा. लष्कर) यांना अटक केली आहे. या दोघांनी मिळून विशाल रंगनाथ चाकोते (वय २३, रा. समृद्धी अपार्टमेंट, नारायणधाम, कात्रज) याचा खून केला होता. त्याचा भाऊ विजय (वय २७) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून अंकितासह तिची आई प्रज्ञा आणि वडील मनीष (तिघे रा. बेनकर कॉर्नर, फ्लॅट क्र. १६, बेनकर वस्ती, वडगाव धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत काशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘अंकिता आणि विशाल हे भारती विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. विशाल केमिकल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला, तर अंकिता ही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेते. या दोघांची मैत्री होती. विशाल हा तिला अभ्यासामध्ये नेहमी मदत करायचा. आरोपी स्वप्निलसोबत तिचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.
शुक्रवारी विशालने भावाला आपण अभ्यासासाठी जात असल्याचे कळवले होते. जेव्हा तो तिच्या घरी पोचला तेव्हा स्वप्निल आधीच तेथे आलेला होता. त्याला पाहून विशालचे अंकिताशी भांडण झाले. त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तिला सोडवण्यासाठी गेलेल्या स्वप्निललाही त्याने मारहाण करायला सुरुवात केली. या दोघांनीही विशालचा ओढणीने गळा आवळून खून केला.’’
खून केल्यानंतर अंकिताने विशाल चक्कर येऊन पडल्याचे आईला कळवले. त्यानुसार प्रज्ञा यांनी विजयला कळवून रुग्णालयात बोलावून घेतले होते. उपचारांपूर्वीच मृत्यू झालेल्या विशालचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अंकिता आणि स्वप्निलला अटक केली. अंकिता व विशाल भारती विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. विशाल केमिकल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला, तर अंकिता ही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेते.