लासुर्णे (पुणे) : छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दोन दशकांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक एकत्र पॅनल तयार करण्यास असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही बोलणी फिसकटली. त्यामुळे पृथ्वीराज जाचक यांनी पुन्हा एकदा आपली वेगळी चूल मांडत लासुर्णे येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय पॅनल उभा करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवार व पृथ्वीराज जाचक यांची युती तुटल्याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रामध्ये रंगू लागली आहे. तत्पूर्वी साखर संघांचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सर्वपक्षीय मेळावा 6 एप्रिल रोजी आयोजित केला होता. याच मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावत छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने तो जर या आर्थिक संकटातून बाहेर काढायचा असेल. तर छत्रपतीची सूत्रे पृथ्वीराज जाचक यांच्या हाती देण्याचे जाहीर सभेत सांगितले होते. परंतु जागा वाटपांच्या बैठकीमध्ये काही जागेवरून मतभेद निर्माण झाले आणि यातून अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक यांची युती तुटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पृथ्वीराज जाचक यांनी काल सभासद तसेच समर्थकांबरोबर झालेल्या बैठकीत १ मे रोजी उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे श्रीनिवास पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी पृथ्वीराज जाचक यांच्याबरोबर कायम राहणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष अड. तेजसिंह पाटील यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
अजित पवार अन् पृथ्वीराज जाचक यांची युती तुटली? काही जागांसाठी मतभेद, मात्र शरद पवार गट सोबत राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:06 IST