शंभरी पार करणाऱ्या शिवाजी पूलाचा ‘हॅपी बर्थ डे’; ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची घेतली शपथ
By श्रीकिशन काळे | Updated: September 16, 2023 17:20 IST2023-09-16T17:19:42+5:302023-09-16T17:20:04+5:30
भारताच्या अभिमानास्पद ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करीत आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत, भगवे झेंडे फडकवित आणि १०० रंगीत फुगे हवेत सोडत छत्रपती शिवाजी पूलाचा १०० वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला...

शंभरी पार करणाऱ्या शिवाजी पूलाचा ‘हॅपी बर्थ डे’; ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची घेतली शपथ
पुणे : भारत माझा देश आहे. माझ्या देशाला विविध कलांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. याचा मला अभिमान वाटतो. या मौल्यवान परंपरेचे जतन करणे आणि संवर्धन करणे माझे कर्तव्य आहे. भारताच्या अभिमानास्पद ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करीत आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत, भगवे झेंडे फडकवित आणि १०० रंगीत फुगे हवेत सोडत छत्रपती शिवाजी पूलाचा १०० वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
ज्या पुलाने पुणेकरांची तब्बल १०० वर्षे सेवा केली त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. इतिहास प्रेमी मंडळातर्फे छत्रपती शिवाजी पूलावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतराव केंजळे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. श्री शिवाजी प्रिपेअेटरी मिल्ट्री स्कूलच्या शंभर शालेय विद्यार्थ्यानी ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याची सामूहिक शपथ यावेळी घेतली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे, केंजळे यांचे वारसदार विनित केंजळे आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
पूर्वी लॉइड ब्रिज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पूलाचे खरे नाव शिवाजी पूल असे आहे. काहीजण नवा पूल म्हणतात, छत्रपती किंवा काॅर्पोरेशन पूल असेही म्हटले जाते.
मराठी माणसाचे योगदान-
शिवाजी पूल ब्रिटिशांनी बांधला असला तरी, त्याच्या बांधकामात एका मराठी व्यक्तीचे योगदान खूप मोठे होते. रावबहादुर गणपतराव महादेव केंजळे यांच्या देखरेखीखाली या पुलाचे बांधकाम झाले. केंजळे हे निरक्षर होते, पण स्थापत्य कलेतील त्यांचे ज्ञान अभियंत्यापेक्षाही मोठे होते. रावबहादुर गणपतराव महादेव केंजळे यांनाही यावेळी अभिवादन करण्यात आले.
मोहन शेटे म्हणाले, सन १९२० पूर्वी मुठा नदी ओलांडण्यासाठी पुण्यात फक्त दोन पुल होते. याच काळात भांबुर्डा गावठाणात वस्ती वाढत होती. म्हणून त्या वेळच्या ब्रिटिश शासनाने शनिवारवाड्यासमोर नवीन पूल बांधण्याचे ठरवले, १९२० च्या जानेवारी महिन्यात या पुलाचे काम सुरू होऊन १७ सप्टेंबर १९२३ रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन झाले.