हनुमंत नाझीरकर यांच्या भाचाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:37+5:302021-03-27T04:10:37+5:30
पुणे : नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर बेशिबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता त्यांच्या भाच्यालाही नाझीरकरांंचे खोटे ...

हनुमंत नाझीरकर यांच्या भाचाला अटक
पुणे : नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर बेशिबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता त्यांच्या भाच्यालाही नाझीरकरांंचे खोटे कृषी उत्पन्न खरे असल्याचे भासवून शेतकऱ्यांच्या खात्यातून रकमांची फेरफार करत, फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल शिवाजी खोमणे (वय ३१, रा.शिरवली, ता.बारामती. जि.पुणे)असे अटक केलेल्याचे नाव आहे. खोमणे हा अमरावती नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांचा भाचा आहे. त्याला न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
खोमणे याने युनुस शेख यांच्या नावे सहकारी बँकेत खाते उघडले. त्यानंतर, नाझीरकर यांच्या वतीने खोमणे हा शेख नावाच्या खात्यात रोख स्वरूपात रक्कम जमा करत होता. त्यानंतर, ही रक्कम चेकद्वारे गुलाब धावडे, हनुमंत नाझीरकर, गीतांजली नाझीरकर यांच्या खात्यात चेकद्वारे जमा झाल्याचे तो भासवित असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता, त्याने याप्रकारे आणखी किती लोकांचे खाते उघडून काळा पैसा पांढरा केला याचा शोध घ्यायचा आहे. त्याने तयार केलेल्या ७ कोटी ६ लाख ८१ हजार ८३० रुपये किमतीच्या बनावट कृषी पावत्या व करारनाम्यांच्या मूळ प्रती जप्त करायच्या असून, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
दरम्यान, बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणात हनुमंत नाझीरकर (वय ५३) यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता, मुलगा भास्कर व मुलगी गीतांजली (रा. स्वप्नशिल्प हाउसिंग सोसायटी, कोथरूड) यांसह अन्य चौघांविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरी घातलेल्या छाप्यात उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची जादा रक्कम, मालमत्ता त्यांच्याकडे आढळली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे यांनी फिर्याद दिली आहे.
.....