धरणांतील साठा निम्म्यावर

By Admin | Updated: September 1, 2015 04:17 IST2015-09-01T04:17:34+5:302015-09-01T04:17:34+5:30

पावसाअभावी पुणे व आसपासची धरणे अर्ध्यापेक्षाही कमी भरली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर पाण्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत

Half of reservoirs in the reservoirs | धरणांतील साठा निम्म्यावर

धरणांतील साठा निम्म्यावर

पुणे : पावसाअभावी पुणे व आसपासची धरणे अर्ध्यापेक्षाही कमी भरली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर पाण्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या मुळा खोऱ्यातील ४ धरणांमध्ये मिळून अवघा १४.७७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात तो २६.४२ दशलक्ष घनफूट होता.
पुणे शहराचा पाणीपुरवठा याच चार धरणांवर अवलंबून आहे. सुरुवातीच्या काळात धरणक्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने जी पाठ फिरवली, ती सप्टेंबर सुरू झाला तरी अद्याप कायम आहे. मुळा खोऱ्याबरोबरच पुण्याच्या आसपासच्या सर्वच धरणांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती गंभीर आहे.
नीरा खोऱ्यात पवना, कासारसाई, मुळशी, कलमोडी, चासकमान, भामा-आसखेड, आंध्र, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांमध्ये मिळून फक्त २६.३३ घनलक्ष फूट पाणीसाठा आहे. मागील वर्षी या महिन्यात हा पाणीसाठा ४४.९७ दशलक्ष घनफूट होता. नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड ही धरणे कुकडी खोऱ्यात येतात. त्यामध्ये मागील वर्षी या महिन्यात २८.६७ दशलक्ष घनफूट पाणी होते. यंदा ते फक्त फक्त १०.४४ दशलक्ष घनफूट आहे. त्यातही घोड, नाझरे ही धरणे ठणठणीत आहेत.
कृष्णा उपखोऱ्यात धोम बलकवडी, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयना, वारणा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव ही धरणे कृष्णा उपखोऱ्यात येतात. त्यातील एकूण पाणीसाठा बऱ्यापैकी चांगला म्हणजे १६४.६१ दशलक्ष घनफूट आहे. मागील वर्षी तो १९५.८६ दशलक्ष घनफूट होता. या धरणांमध्ये पाणी दिसत असले तरी तिथेही धरणक्षेत्रात सध्या पावसाने दडीच मारलेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Half of reservoirs in the reservoirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.