कुकडीत यंदा निम्माच साठा
By Admin | Updated: August 20, 2015 02:33 IST2015-08-20T02:33:26+5:302015-08-20T02:33:26+5:30
कुकडी प्रकल्पात आजमितीस ३९.७७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात ७७.३१ एवढा पाणीसाठा झाला होता

कुकडीत यंदा निम्माच साठा
डिंभे : कुकडी प्रकल्पात आजमितीस ३९.७७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात ७७.३१ एवढा पाणीसाठा झाला होता. यंदाचा प्रकल्पातील पाणीसाठा ही चिंतेची बाब असून, पावसाळ्याच्या मध्यावरच पावसाने आखडते घेतल्याने यंदा प्रकल्पातील धरणे भरतील की नाही याची चिंता आहे. त्यातच ऐन पावसाळ्याच्या हंगामातच धरणांतून पाणी सोडले जाऊ लागले आहे.
सध्या डिंभे धरणातून ६५० क्युसेक्स, तर येडगाव धरणातून १४०० क्युसेक्स एवढ्या जलद गतीने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातील नागरिकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांमध्ये यंदा १२.१४ टीएमसी एवढा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. मागील पावसाळ्यात आजच्या मितीस या प्रकल्पातील सर्वच धरणांमध्ये १०० टक्केच्या आसपास पाणीसाठा झाला होता. प्रकल्पातील महत्त्वाचे समजले जाणार डिंभे धरण या वेळी भरून वाहत होते. सध्या प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली असल्याने धरणामध्ये अतिशय संथ गतीने पाणी जमा होत आहे. असे असताना धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे.
डिंभे धरणातून आजमितीस ६५० क्युसेक्स पाणी जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणात सोडण्यात येत आहे. तर येडगावमधून जवळपास १४०० क्युसेक्स एवढ्या जलद गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे आवर्तन १३ आॅगस्टपासून सुरू झाले असून, पुढे २२ दिवस सुरू राहणार असल्याची माहिती कुकडी प्रकल्प शाखा विभागाकडून देण्यात आली आहे.
जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार होतो. आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण सात तालुक्यांमधील सुमारे १५६२७८ एवढे मोठे क्षेत्र कालव्यांद्वारे सिंचनाखाली येत आहे. (वार्ताहर)