अर्ध्या बारामतीला दुष्काळाच्या झळा
By Admin | Updated: September 2, 2015 04:09 IST2015-09-02T04:09:41+5:302015-09-02T04:09:41+5:30
आॅगस्ट संपला तरी बारामती तालुक्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. जिरायती भागातील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. भूजलपातळी खालावल्याने

अर्ध्या बारामतीला दुष्काळाच्या झळा
महेंद्र कांबळे, बारामती
आॅगस्ट संपला तरी बारामती तालुक्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. जिरायती भागातील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. भूजलपातळी खालावल्याने बोअरवेल्स बंद पडल्या आहेत. तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यात सध्या २२ हजार १७९ लोकांना ११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १० सरकारी, १ खासगी टँकरद्वारे दिवसात ४७ खेपा केल्या जात आहेत.
सुपे परगण्यातील वढाणे ते शिर्सुफळ अशी २० गावे, जोगवडी ते कऱ्हावागजपर्यंतची २२ गावे अशी ४२ गावे सतत पाणीटंचाईच्या छायेत असतात. मागील ४ वर्षांपासून पावसाने ओढ दिल्याने या भागातील शेतीची परिस्थिती फारच अडचणीची असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. तालुक्यातील पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, जोगवडी, मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, कानाडीवाडी, मोरगाव, तरडोली, सायबाचीवाडी, आंबी बुद्रुक, माळवाडी, भिलारवाडी, मुढाळे, जळकेवाडी, जळगाव, कडेपठार, कऱ्हावागज या गावांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. चार वर्षांपासून पाऊस नाही. तरडोली, लोणीभापकर, पळशी, सायबाचीवाडी, भोईटेवाडी या भागात पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठे पाझर तलाव आहेत. मागील चार वर्षांपासून पाझर तलावात पाणीच आलेले नाही. कऱ्हा नदीवरील बंधारे कोरडे पडले आहेत.
यासंदर्भात लोणीभापकर येथील दत्तात्रय बारवकर यांनी सांगितले, की शेतीच्या पाण्याचा प्रश्न मागील चार वर्षांपासून आहे. गाव सोडून जावे, असे सतत वाटते. पाण्यासाठी शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत. ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले आहे. बारामती तालुक्यातील हे विदारक चित्र आहे.
या २२ गावांना पाणी मिळण्यासाठी अंध शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानुसार तब्बल ६८ कोटी रुपये तातडीने पाणी मिळण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी खर्च केले. वर्षापूर्वी भोईटेवाडी तलावात पुरंदर उपसाचे पाणी सोडण्यात आले. त्यासाठी आश्वासनपूर्ती केल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर आजअखेर पुरंदरचे पाणी पुन्हा मिळालेले नाही.