पुणे: जीएसटी (वस्तू व सेवा कर) करातील कपात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळेच झाली असल्याचा दावा करत काँग्रेसच्या वतीने न्यू इंग्लिश स्कुल चौकात त्यांच्या अभिनंदनाचा जाहीर कार्यक्रम करण्यात आला. राहुल यांच्या अभिनंदनाचे फलक हातात धरून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, ओबीसी आघाडीचे पदाधिकारी प्रशांत सुरसे, इंटकचे चेतन अगरवाल, अयूब पठाण व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जोशी यांनी सांगितले की राहुल गांधी जीएसटी सुरू झाला त्यावेळेपासूनच म्हणजे तब्बल ७ वर्षांपूर्वीपासून जीएसटी मध्ये बदल करण्याची मागणी करत होते. गब्बर टॅक्स असे नावच त्यांनी या कराला दिले. केंद्र सरकार त्यावेळी ही मागणी धुडकावून लावत होते. चार स्तरामध्ये लावण्यात आलेला हा कर देशातील व्यापारी तसेच उत्पादक यांच्यासाठी मारक ठरला. तरीही केंद्र सरकार नेटाने ही वसुली करत होते.
राहुल यांच्या मागणीला देशभरातून प्रतिसाद मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारला अचानक जाग आली व त्यांनी या करप्रणालीत बदल केला. ही मागणी राहुल गांधी यांनी सर्वप्रथम केली असल्याने याचे श्रेय त्यांनाच असल्याचे जोशी यांनी सांगितले. यापूर्वीही राहुल यांनी देशस्तरावर जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती, त्याला केंद्र सरकार नकार देत होते. त्यानंतर काही वर्षांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च अशी जातनिहाय जनगणना होणार असल्याचे जाहीर केले. मोदी झुकता है, जब राहुल गांधी बोलता है असाच याचा अर्थ असल्याचा दावा करत तशा घोषणाही या कार्यक्रमात करण्यात आल्या.