पुणे: शहरात मेट्रोचे जाळे आणखी विस्तारित केले जाणार असून, महापालिकेच्या मुख्यसभेने मंगळवारी (दि. १८) हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या दोन मेट्रो मार्गांच्या प्रकल्प अहवालास मंजुरी दिली आहे. यासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपये खर्च येणार आहे.
पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि महामेट्राे यांनी पुणे महापालिका क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतूक विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पुणे शहराचा भविष्यात हाेणारा विस्तार आणि विकास लक्षात घेऊन मेट्राेमार्गांचा अधिक विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा)च्या बैठकीत हडपसर ते लाेणी काळभाेर आणि हडपसर ते सासवड या दाेन मेट्राे मार्गिंकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा प्रकल्प अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी महापालिकेच्या मुख्यसभेसमोर ठेवण्यात आला होता. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत त्यास मंजुरी देण्यात आली.
या विस्तारित प्रकल्पासाठी महापालिकेला जमिनीसाठी सुमारे ३ काेटी ६० लाख रुपये इतके याेगदान द्यावे लागणार आहे. या मार्गिकांना केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर हे पैसे द्यावेत, त्यासंदर्भात महामेट्राेशी करारनामा करावा, हा प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या काेणत्याही कर्जाची हमी महापालिका घेणार नाही, प्रकल्प राबविण्यासाठी महामेट्राेकडून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असेही प्रस्तावात नमूद केले आहे.
हडपसर ते लोणी काळभोर हा मेट्रोमार्ग ११.५ किलोमीटर लांबीचा असेल. हडपसर ते सासवड हा मेट्रोमार्ग ५.५७ किलोमीटर लांबीचा असेल. यासाठी केंद्र सरकार २० टक्के निधी देणार आहे. कर्ज स्वरूपात ६० टक्के निधी उभारण्यात येणार आहे. हडपसर ते लोणी काळभोर मार्गावरील १० मेट्रो पैकी ६ हे मेट्रो स्टेशन आणि हडपसर ते सासवड मार्गावर २ मेट्रो स्टेशन महापालिका हद्दीमध्ये असतील. - डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका.
बालाजी नगर मेट्रो स्थानकालाही मंजुरी...
स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गावर तीनच मेट्रो स्थानके प्रस्तावित केली होती. पद्मावती ते कात्रज या स्थानकातील अंतर १.९०० इतके होते. त्यामुळे धनकवडी, बालाजीनगर येथील नागरिकांना मेट्रोचा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. येथील नागरिक आणि राजकीय मंडळींच्या मागणीनुसार बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्याचे महोमेट्रोने मान्य केले आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास मंगळवारी महापालिकेच्या मुख्यसभेने मंजुरी दिली.