धुणेभांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणाऱ्या महिला दाखवून लाटले अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:33+5:302021-05-14T04:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने देहविक्री करणाऱ्याा महिलांना ३ महिन्यांपासून प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले ...

धुणेभांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणाऱ्या महिला दाखवून लाटले अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने देहविक्री करणाऱ्याा महिलांना ३ महिन्यांपासून प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. कायाकल्प संस्थेतील सभासदांनी सहकारनगर, दत्तवाडी, लक्ष्मीनगरमध्ये धुणेभांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणाऱ्याा महिला दाखवून शासनाचे अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कायाकल्प संस्थेच्या ३ महिलांसह ५ जणांना अटक केली आहे. शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेतल्याचा हा प्रकार समोर आला असून खरोखरच वेश्या व्यवसाय करणाऱ्याा महिलांपर्यंत हे अनुदान पोहोचले का, याविषयी शंका उपस्थित झाली आहे.
गौरी तेजबहाद्दूर गुरुंग (वय ३२, रा. मनाली अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी), सविता अशोक लष्करे (वय २६, रा. यशवंतनगर, येरवडा), सारिका अशोक लष्करे (वय ३०, रा. यशवंतनगर, येरवडा), महेश राजू घडसिंग (वय २६, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रोड) आणि अमोल दत्तात्रय माळी (वय २५, रा. बालाजीनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी नायब तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी, देहविक्री करणाऱ्याा महिलांना कोरोनाकाळात उपासमार होऊ नये, म्हणून त्यांचे कोणतेही ओळखपत्र न घेता अनुदान वाटप करण्याचे आदेश दिलेले होते. अशा महिलांची यादी बनविण्याचे काम कायाकल्प संस्था व त्यांचे पदाधिकारी यांना देण्यात आले होते.
कायाकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देहविक्री करणाऱ्याा महिलांऐवजी लक्ष्मीनगर, सहकारनगर, दत्तवाडी भागात धुणेभांडी व इतर लहानसहान कामे करणाऱ्याा गरीब महिलांना कोरोनामध्ये कामधंदा नसल्याने ३ महिन्यांकरिता प्रत्येकी ५ हजार रुपये संस्थेकडून मिळणार असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडून सर्व बँक खात्यांची माहिती घेतली व ती शासनाला या महिला देहविक्री करणाऱ्याा असल्याचे भासविले. शासनाने त्यांच्या खात्यात २३ एप्रिल रोजी प्रत्येकी ५ हजार रुपये असे १५ हजार रुपये जमा केले. या महिलांच्या खात्यात १५ हजार रुपये जमा झाल्यावर कायाकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्याांनी यातील प्रत्येकी १० हजार रुपये वरिष्ठ अधिकारी व इतर काही अनाथ लोकांना द्यायचे आहेत, असे सांगून त्यांच्याकडून शासकीय निधीतील प्रत्येकी १० हजार रुपये परत घेतले. अशा प्रकारे त्यांनी तब्बल ५२ महिलांकडून प्रत्येकी १० हजार रुपये असे ५ लाख २० हजार रुपयांचा अपहार केला असल्याचे उघडकीस आले आहे.