बावडा : वडा बावडा (ता. इंदापूर, जि. पुणे ) येथे दि. 30 जून 2025 रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळाइंदापूर मुक्काम करून सकाळी सराटी येथे मुक्काम दिशेने जात असताना पुणे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाकडे असलेले सर्वात मोठे गाव बावडा येथे अतिशय दिमाखात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. बावडा ग्रामस्त भजनी मंडळ यांनी पालखी रथा समोर टाळ मृदंग व हरिनामाचा गजर करत स्वागत केले. श्री शिवाजी विद्यालय बावडा येथून पालखी रथातून खांद्यावर घेऊन बावडा बाजार तळ येथे आणण्यात आले. त्यानंतर आरती संपन्न झाली. इंदापूर ते सराटी पालखी महामार्गातील बावडा याठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जास्त काळ दर्शनासाठी थांबला जातो. श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष जालिंदर मोरे आणि पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायत बावडा यांच्या वतीने दर्शनमंडप तसेच आकर्षक रांगोळ्या यांची सजावट करण्यात आली. श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी राम सीता लक्ष्मण या विश वेशभूषा तसेच पताका घेऊन विद्यार्थी तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ऋवेदा आयुर्वेदिक क्लिनिक बावडा डॉ. ऋचा गारटकर व डॉ. ऋषीकेश गारटकर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दूधगंगा सहकारी संघ यांच्या वतीने मोफत सुगंधी दूध वाटप करण्यात आले.
दर्शन रांगेच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त
बावडा येथील अनुराधा बंगला ते दोशी पेट्रोल पंप येथील महामार्गाचे अपूर्ण कामामुळे वाहतूक या मार्गातून कसल्याही पद्धतीने करता आली नाही. परिणामी बावडा गावातून जाणाऱ्या रस्त्यावर वाहन चालक व वारकऱ्यांना पायी चालताना गर्दीचा त्रास सहन करावा लागला. यावेळी वाहतूक पोलीस विभाग यांनी अतिशय योग्य असे नियोजन करून मार्ग मोकळा करून दिला.