सुप्याच्या प्रारुप विकास आराखड्याला ग्रामसभेत विरोध; ग्रामसभेचा विरोधी ठराव सर्वानुमते मंजुर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 22:19 IST2025-03-24T22:15:59+5:302025-03-24T22:19:22+5:30
मार्च २०२५ मध्ये शासनाच्यावतीने तो आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे आणि ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे यांनी दिली.

सुप्याच्या प्रारुप विकास आराखड्याला ग्रामसभेत विरोध; ग्रामसभेचा विरोधी ठराव सर्वानुमते मंजुर
सुपे दि. २४ ( वार्ताहर )- बारामती तालुक्यातील सुपे येथील प्रसिद्ध झालेल्या प्रारुप विकास आराखड्याला ( डीपी प्लॅन ) सोमवारी ( दि. २४ ) घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये विरोध करण्यात आला.
येथील सरपंच तुषार हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २६ जानेवारी २०२० मध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये सुप्याचा प्रारुप विकास आराखडा करण्यात यावा, याबाबतचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार मार्च २०२५ मध्ये शासनाच्यावतीने तो आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे आणि ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे यांनी दिली.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने माजी सभापती दिलीप खैरे, ॲड. चंद्रशेखर जगताप, विलास धेंडे यांनी प्रारुप विकास आराखड्याविषयी चर्चा केली. सुप्याच्या सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्राविषयी बोलताना जगताप म्हणाले की, येथील सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र हे अभयारण्यासाठी संरक्षित आहे. तर राहिलेल्या क्षेत्रात शेतकरी आपली उपजिविका करीत आहे. त्यापैकी ५० ते ६० हेक्टर क्षेत्र गावठाण आहे. येथील मागिल दहा वर्षाची लोकसंख्या विचारत घेता प्रतिवर्षी दिड ते दोन टक्याने सुप्याची लोकसंख्या वाढत आहे. सद्या येथे सुमारे ५ हजार मतदार तर राहिलेल्या आठरावर्षाखाली दिड हजार मिळुन साडेसहा हजार लोकसंख्या होत आहे. त्यामुळे ऐवढ्या कमी लोकसंख्येला सुप्याला डिपी प्लॅन नको आहे.
या डिपी प्लॅनमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरावर तसेच शेतीवर नांगर फिरत असेल तसेच काही भुमिहीन होणार असतील तर हा डिपी प्लॅन राबवुन गावाला कोणताही उपयोग नसल्याने त्यास विरोध म्हणुन उपस्थित ग्रामस्थांनी हात वर करुन ग्रामसभेत निर्णय घेतला.
यावेळी माजी सभापती दिलीप खैरे म्हणाले की, येथील डीपी प्लॅन बनवताना गोरगरीबांच्या जागेवर आकस ठेवुन आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी माहिती नसताना त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने हा डीपी प्लॅन बनवुन सर्वसामान्याचे हाल केले आहेत. त्यामुळे हा डीपी प्लॅन रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विलास धेंडे यांनी ग्रामसभेला हा डीपी प्लॅन रद्द करण्याचा अधिकार आहे का? याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे विचारणा करुन हा प्लॅन रद्द करण्याची मागणी केली.
दरम्यान येथील प्रारुप विकास आराखड्यास ग्रामसभेत सर्वानुमते विरोध असल्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे यांनी दिली.