कोरोना चाचणी शिवाय 12 हजार कर्मचारी घेणार ग्रामपंचायत निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:41+5:302021-01-13T04:27:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील 650 ग्रामपंचायतीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, या निवडणुकीसाठी तब्बल ...

कोरोना चाचणी शिवाय 12 हजार कर्मचारी घेणार ग्रामपंचायत निवडणुका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील 650 ग्रामपंचायतीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, या निवडणुकीसाठी तब्बल 12 हजार पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु कोरोना चाचणी न करताच या कर्मचा-यांना निवडणूक कामाला लावले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचा-याची चाचणीसाठी यंत्रणाच नसल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
जिल्ह्यात 746 ग्रामपंचायती निवडणुका जाहीर झाल्या आहेत, यापैकी 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, आता 650 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. यासाठी तब्बल 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, तयारी अखेरच्या टप्प्यात आली आहे. यासाठी एक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 2 हजार 461 मतदान केंद्र असून, सुमारे 12 हजार 305 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
-------
प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचा-याची नियुक्ती
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने प्रशासनाकडून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना हॅन्डग्लोज, सॅनिटायझर पुरवण्यात येणार आहे. तसेच मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर एक आरोग्य कर्मचा-याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
----
- मतदान होणा-या ग्रामपंचायती : 650
- एकूण मतदान केंद्र : 2461
- निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार : 11007
- निवडणूक अधिकारी, कर्मचारी : 12305
--