अखेर रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका जाहीर; ५०३ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 20:57 IST2021-11-18T20:57:18+5:302021-11-18T20:57:29+5:30
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे

अखेर रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका जाहीर; ५०३ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान
पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३१७ ग्रामपंचायतींच्या ५०३ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये २२ नोव्हेंबर (सोमवार) पर्यंत सुधारणा करण्यात येईल. तहसीलदार २२ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. सात डिसेंबर रोजी उमेवारी अर्जांची छाननी होईल, तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर आहे. मतदान २१ डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत राहील. मतमोजणी २२ डिसेंबर (बुधवार) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्या ठिकाणी व वेळेनुसार होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २७ डिसेंबर २०२१ (सोमवार) पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.