पुणे : आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणीही आमदार बोलणार नाही अशा अतिशय निद्य भाषेत माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली. त्यांचे हे वक्तव्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी केलेल्या मतचोरीच्या आरोपांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने व्यक्त केली.
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सुनील माने म्हणाले, कोणीही आमदार या भाषेत बोलणार नाही. पडळकर चांगले बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीतच, पण राहुल गांधी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत नावे वगळण्यात आलेल्या मतदारांना समोर उभे करत मतचोरीचा आरोप केला. त्याची चर्चा राज्यात होत होती. नेमके त्याच वेळी पडळकर या पद्धतीने बोलले. या दोन्हीचा परस्परांशी संबध असावा अशी शंका घेण्यास जागा आहे. कारण पडळकर इतके भडक बोलले की त्याचीच चर्चा राज्यभरात सुरू झाली.
भाजपमुळे एकूणच राजकारणाचा स्तर खालावला गेल्याचे माने यांनी सांगितले. त्यातही भाजपत नव्याने घेतलेले गेलेलो लोक मुळ भाजपपेक्षा आपण अधिक कडवे आहोत हे सांगण्यासाठी वाटेल तो बोलतात. ज्यांनी त्यांना पक्षात घेतले, त्यांचेच राजकीय डोके यामागे असू शकते. आताही देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नाराजीच्या फोननंतर केवळ मोजक्या शब्दांत पडळकर यांना समज दिली आहे. त्यातही ते तरूण आहेत, बोलताना आक्रमक होतात अशा शब्दांमध्ये त्यांचे एकप्रकारे कौतुकच केले असल्याचे माने यांनी लक्ष वेधले.