गुड न्यूज राज्यातील पावसाचे मळभ दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:32+5:302021-01-13T04:27:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आग्नेय अरबी समुद्र ते वायव्य मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्र ते ...

गुड न्यूज राज्यातील पावसाचे मळभ दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आग्नेय अरबी समुद्र ते वायव्य मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्र ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले काही दिवस पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी पाऊस झाला होता. आता ढगाळ वातावरण आणि पावसाचे मळभ दूर झाले आहे. सोमवारपासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात जवळपास ५ दिवसांहून अधिक काळ ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या अंदाजाने दिलासा दिला आहे. त्याचवेळी राज्यात अजूनही पूर्वेकडून वारे वाहत असल्याने उत्तरेकडील वार्यांना दक्षिणेकडे येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस राज्यातील किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १५.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
रविवारी दिवसभरात कोल्हापूर येथे ०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत, कोकण, गोव्याच्या बऱ्याच भागांत व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे.
११ ते १४ जानेवारीपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.