कामाच्या पलीकडे जात व्यक्तिगत संबंध जपणे कौशल्य : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:13 IST2021-02-27T04:13:06+5:302021-02-27T04:13:06+5:30

पुणे : इरसाल पुढारी, नेते यांना सांभाळून ग्रामीण भागात पत्रकारिता करणे खूप अवघड असते. ही जबाबदारी पार पाडताना, कामाच्या ...

Going beyond work skills to maintain personal relationships: Raju Shetty | कामाच्या पलीकडे जात व्यक्तिगत संबंध जपणे कौशल्य : राजू शेट्टी

कामाच्या पलीकडे जात व्यक्तिगत संबंध जपणे कौशल्य : राजू शेट्टी

पुणे : इरसाल पुढारी, नेते यांना सांभाळून ग्रामीण भागात पत्रकारिता करणे खूप अवघड असते. ही जबाबदारी पार पाडताना, कामाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी व्यक्तिगत संबंध जपणे हे मोठे कौशल्य असते, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी लिहिलेल्या ‘चुका, खुलासे अन किस्से’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. २६) झाले. त्यानंतर शेट्टी बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, भाजपा नेते बाबा जाधवराव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, विश्वजित जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले की, १९९० नंतर पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. पत्रकारिता करताना समयसूचकता राखून समाजहिताचे काम करणे ही सोपी गोष्ट नाही. दौंडकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या काळातील काही किस्से खुमासदार पद्धतीने पुस्तकात मांडले आहेत.

खासदार बारणे यांनी डिजिटलच्या युगातही वर्तमानपत्राचे महत्त्व कमी झाले नसल्याचे सांगून, प्रत्येक माणूस हा सकाळी प्रथम वर्तमानपत्र वाचतोच याकडे लक्ष वेधले. निर्मला पानसरे यांनी पत्रकार व लोकप्रतिनिधी यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगून, पत्रकार हा जनसामान्यांना न्याय देणारा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे सांगितले. श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग खेसे यांनी आभार मानले. तनिष्का डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Going beyond work skills to maintain personal relationships: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.