देवस्थानांच्या बाहेर बसणाऱ्या अनेकांवर कोरोना टाळेबंदीने आर्थिक अरिष्ट आणले. हारफुलांसह देवदेवतांची छायाचित्रे, मुर्ती, धार्मिक पुस्तके, पोथ्या, देव्हारे या सगळ्यांच्याच विक्रीवर मर्यादा आली. विशिष्ट वारी, सणांना हमखास व्यवसाय हे या बाजाराचे वैशिष्ट्य. तेच कोरोनामुळे मोडीत निघाले. गणेशोत्सव, नवरात्र, महावीर जयंती, ईद, बौद्ध जयंती सगळे सुनेसुने गेले. देवालये सुरू झाल्यावर आता हे चक्र हळुहळू पुन्हा फिरण्यास सुरुवात झाली आहे.
सराफांकडे मोडू लागले दागिने
अगदी लहान दुकान असले तरीही ते झगमगीत करणाऱ्या सराफांनाही कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा मोठा फटका बसला. सलग काही महिने संपूर्ण व्यवसाय बंद होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. त्यानंतर अनलॉक झाले, दुकाने उघडली, मात्र दागिने करण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आता कुठे त्यांची व्यवसायाची गाडी पुर्वपदावर येत आहे.