देव निघाले लग्नाला...

By Admin | Updated: February 11, 2017 02:41 IST2017-02-11T02:41:45+5:302017-02-11T02:41:45+5:30

श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथील भक्त तुळाजीबुवा मंदिरापासून ठिक १२.३० वाजण्याच्या सुमारास श्रीक्षेत्र वीर

God left the marriage ... | देव निघाले लग्नाला...

देव निघाले लग्नाला...

गराडे : श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथील भक्त तुळाजीबुवा मंदिरापासून ठिक १२.३० वाजण्याच्या सुमारास श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील विवाह सोहळ्यासाठी माघ पौर्णिमा शुक्रवारी (दि. १०) शाही दिमाखात प्रस्थान झाले.
श्रीक्षेत्र कोडीत येथे शुक्रवारी पहाटे उत्सवमूर्तींना अभिषेक घालण्यात आला. ढोल-ताशांच्या व पारंपरिक वाद्याच्या गजरात मानाच्या काठीसह छत्री, अब्दागिरी, चवऱ्या ढाळत देऊळवाड्यातून जवळ असणाऱ्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे परमभक्त असलेल्या तुळाजी मंदिरात पालखी विसावली. पालखीसह सर्व लवाजमा विसावल्यावर उपस्थित श्रीनाथभक्तांनी ‘सवाई सर्जाचं चांगभलं’चा जयघोष केला. यामुळे संपूर्ण श्रीक्षेत्र कोडीतनगरी दुमदुमून गेली. यानंतर वीर येथील १० दिवसांच्या यात्रेसंबंधी नियोजनाची बैठक झाली. या वेळी कोडीत ग्रामस्थ सालकरी, मानकरी श्री देवनाथ म्हस्कोबा महाराज ट्रस्टचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
आज (दि. १०) पहाटे ५ वाजता उत्सवमूर्तींना महारुद्राभिषेक घालून उत्सवमूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी उत्सवमूर्तींचे दर्शन घेतले. दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेऊन हजारो भाविक पायी अनवाणी वीरकडे पारंपरिक वाटेने चालत निघाले. दुपारी १२ वाजण्याच्या अगोदर सर्वांची लगबग सुरू झाली. पालखीजवळ मानकरी, सालकरी, अब्दागिरी, छत्र, निशाण घेऊन मानकरी उभे होते. ठीक १२.३० वाजता तुतारी वाजली व मानकऱ्यांनी श्रीनाथ म्हसोबा महाराजांच्या पालखीला खांदा लावला. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्याचा गजर सालकरी, मानकरी, ग्रामस्थ व हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीनाथांच्या पालखीचे श्रीक्षेत्र वीरकडे शाही प्रस्थान सुरू झाले. या पालखीपुढे मानाची काठी पालखीसमवेत दागदागिनदार अब्दागिरी चवऱ्या ढाळत हजारोंच्या अक्षता झेलत धीम्या गतीने पालखीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. पालखी नदीपलीकडे गेल्यावर नागदरी या ठिकाणी पारंपरिक मेंढ्यांचे रिंगण वाद्याच्या गजरात पार पडले. पिंपळे ते वीर अशा पालखीमार्गावर पुणे येथील जयश्री आर्टच्या कलावंतांनी रांगोळ्या काढल्या. (वार्ताहर)

Web Title: God left the marriage ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.