पुणे: वाढते जागतिक तापमान भविष्यात नवीन रोगाच्या साथींना आमंत्रण देणारे ठरणार आहे. एव्हरेस्ट शिखरावरील बर्फ, अंटार्क्टिका खंड आणि परिसरातील हिम नद्या वेगाने वितळत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडण्याच्या स्थितीत आहेत. प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात हे जीवाणू आणि विषाणू आल्यास जगभरात रोगाच्या नवीन साथी येतील, असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. नवीन कुमार यांनी दिला.
'जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कुमार बोलत होते. वाढत्या जागतिक तापमानामूळे 'भविष्यात नवीन रोगाच्या साथी येतील. याला जागतिक तापमानवाढ प्रामुख्याने कारणीभूत ठरणार आहे. प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड यामूळे मनुष्य आणि प्राण्यांमधील संपर्क आणि संघर्ष वाढत आहे. प्राण्यांच्या संपर्कातून साथरोग वेगाने पसरत आहेत. जगभरात मानवाचा प्रवास वाढला आहे. या प्रवासादरम्यान विवध रोगांचा प्रसारही वेगाने होत असल्याचे डॉ. कुमार यांनी नमूद केले. नवीन रोगांच्या साथींना प्रतिबंध करू शकत नसलो तरी आपण त्यांचा सामना करण्यास सज्ज आहोत. असेही त्यांनी सांगितले.
तापमानवाढीचे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम
सार्वजनिक आरोग्यावर जागतीक तापमानवाढीचे गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे डासांचे जीवनचक्र २१ दिवसांवर आल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढते. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे हे प्रमुख कारण आहे. थंड हवेच्या ठिकाणी तापमान वाढल्याने तिथेही डासांची उत्पत्ती वाढत आहे. तीथे कीटकजन्य आजारांचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. या अगोदर तीथे असे आजार नसल्याने तेथील नागरिकांमध्ये रोगाला प्रतिकार करणारी शक्ती नसते. त्यामुळे हे आजार वेगाने पसरत आहेत, परिणामी मृत्यूदरही वाढता आहे. - डॉ. प्रदीप आवटे, निवृत्त राज्य सर्वेक्षण अधिकारी