शासनादेशाची वाट न पाहता बक्षिसे द्या
By Admin | Updated: July 16, 2014 04:13 IST2014-07-16T04:13:16+5:302014-07-16T04:13:16+5:30
महापालिकेने तीन आॅलम्पिकपटूंना शासनाची मान्यता न घेता प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले.

शासनादेशाची वाट न पाहता बक्षिसे द्या
पिंपरी : महापालिकेने तीन आॅलम्पिकपटूंना शासनाची मान्यता न घेता प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले. शहरातील खेळाडूंना मात्र नियमावर बोट दाखवून बक्षिसापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. शासनादेशाची वाट न पाहता सर्व खेळाडूंना बक्षिसाची रक्कम महापालिकेने द्यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला.
क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महापालिकेतर्फे बक्षीस दिले जाते. २००८ पासून २७ खेळाडूंना बक्षीस जाहीर केले. मात्र, त्यापैकी पाच खेळाडूंना महापालिकेने बक्षिसाची रक्कम दिली. तीन लाखांहून अधिक रकमेच्या बक्षिसासाठी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असताना महापालिकेने अभिनव बिंद्रा, विजेंद्र सिंग व सुशील कुमार या तीन आॅलम्पिकपटूंना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले. या रकमेचा प्रस्ताव अद्यापही शासनाकडे पडून आहे.
महापालिकेने विराज लांडगे व मोमीन शेख या दोन खेळाडूंना प्रत्येकी २ लाख ९९ हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. उर्वरीत ज्या २२ खेळाडूंना बक्षीस जाहीर केले होते, ते देताना वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत.
वैयक्तिक स्वरूपात बक्षीस देता येत नाही. क्रीडा संस्थेला बक्षीस रक्कम देता येते, असे क्रीडा विभागाचे अधिकारी सांगतात. वेळोवेळी सबब सांगून बक्षीस देण्याचे टाळले जाते. महापालिका नियम दाखवून स्थानिक खेळाडंूना बक्षीस रक्कम देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. अनावश्यक कामांवर कोट्यवधींची उधळपट्टी करणाऱ्या महापालिका प्रशासनाला खेळाडूंविषयी आस्था नाही, असा संताप स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी व्यक्त केला. महापालिका सभागृहाचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी महापौर मोहिनी लांडे यांनी महापालिका सभागृहातील सत्कार समारंभ बंद केले. त्याऐवजी महापौर दालनामध्ये सत्कार समारंभ होऊ लागले. यापुढे महापालिका सभेतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला जावा, अशी भूमिका स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)