तरुणाच्या त्रासामुळे तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:36 IST2019-04-06T00:36:26+5:302019-04-06T00:36:30+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी नयनाचे वडील रघुनाथ सयाजी कदम यांनी फिर्याद दिली.

तरुणाच्या त्रासामुळे तरुणीची आत्महत्या
चाकण : लग्नासाठी वेळोवेळी तरुणीला मेसेज करून, तुझी बदनामी करीन व ठरलेले लग्न मोडीन, अशी धमकी देऊन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयना रघुनाथ कदम (वय २३, रा. कोळीये, ता. खेड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र अशोक ससाणे (रा. कोळीये, ता. खेड, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी नयनाचे वडील रघुनाथ सयाजी कदम यांनी फिर्याद दिली. ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळी ११.३० च्यादरम्यान कोळीये येथील कदम यांच्या राहत्या घरात घडली. सुमारे एक वर्षापासून नयनाला महेंद्र याने वेळोवेळी समक्ष भेटून, तसेच तिला कॉल व मेसेज करून ‘तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझे लग्न होऊ देणार नाही. तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत होता. महेंद्रमुळे नयनाचे ठरलेले लग्न मोडले होते. महेंद्रच्या सततच्या त्रासामुळे नयनाने कंटाळून बुधवारी राहत्या घरी आत्महत्या केली. नयनाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.