डॉक्टरांच्या मानगुटीवर कचऱ्याचे ‘भूत’

By Admin | Updated: September 13, 2014 05:23 IST2014-09-13T05:23:06+5:302014-09-13T05:23:06+5:30

शहराचे सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिका-यांच्या डोक्यावर कच-याचीही जबाबदारी

'Ghost' of waste on doctors' honor | डॉक्टरांच्या मानगुटीवर कचऱ्याचे ‘भूत’

डॉक्टरांच्या मानगुटीवर कचऱ्याचे ‘भूत’

पुणे : शहराचे सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिका-यांच्या डोक्यावर कच-याचीही जबाबदारी असल्याने आरोग्य सोडून केवळ कचरा निर्मूलनाचे काम हे अधिकारी करीत आहेत. विशेष म्हणजे २00४ मध्ये शहरात या वर्षी प्रमाणेच डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला असताना, १२ क्षेत्रीय कार्यालयांत ती रोखण्यासाठीच या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. या वेळी सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी सांभाळून या डॉक्टरांकडे घनकचरा निमूर्लन तसेच व्यवस्थापनाचे काम देण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत ही बाब याउलट झाली असून, आरोग्याला दुय्यम स्थान देऊन, कचरा उचलण्याच्या नियोजनपासून निर्मूलनाच्या कामातच या कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे.
शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल २ हजारांहून अधिक रुग्ण शहरात आढळून आले असून, हजारो ठिकाणी साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होत आहे. ही पैदास रोखणे तसेच ही ठिकाणे शोधून ती नष्ट करण्याची जबाबदारी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे. असे शहरात सुमारे १५ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत. मात्र, त्यातील एकाही अधिकाऱ्याकडून ही जबाबदारी पार पाडली जात नसल्याचे चित्र आहे. याबाबत माहिती घेतली असता, डॉक्टरांची पदवी घेतलेले हे वैद्यकीय अधिकारी घनकचरा व्यवस्थापनाच्या एक, दोन नव्हे तर तब्बल २२ जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे दिसून आले. कचऱ्याचे काम हे दैनंदिन असल्याने तसेच दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत असल्याने या कामातून वेळ मिळाला तरच आरोग्य विभागाचे काम सांभाळणे शक्य होत असल्याचे हे वैद्यकीय अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. त्यामुळे शहरात डेंग्यूने पुणेकरांवर मृत्यूचे
सावट घोंगावत असताना, ते रोखण्यासाठी असणारी आरोग्य विभागाची यंत्रणा इतरत्र व्यस्त असल्याने पुणेकर रामभरोसे असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)

Web Title: 'Ghost' of waste on doctors' honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.