एबी स्कॅन मशिनद्वारे लिंगनिदान

By Admin | Updated: November 2, 2015 01:15 IST2015-11-02T01:15:56+5:302015-11-02T01:15:56+5:30

महापालिकेच्या गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र विभागाने (पीसीपीएनडीटी सेल) गोपनीय पद्धतीने केलेल्या एका स्टिंग आॅपरेशनमध्ये नेत्रतज्ज्ञांकडील एबी स्कॅन

Gender diagnosis by AB scan machine | एबी स्कॅन मशिनद्वारे लिंगनिदान

एबी स्कॅन मशिनद्वारे लिंगनिदान

दीपक जाधव, पुणे
महापालिकेच्या गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र विभागाने (पीसीपीएनडीटी सेल) गोपनीय पद्धतीने केलेल्या एका स्टिंग आॅपरेशनमध्ये नेत्रतज्ज्ञांकडील एबी स्कॅन (एल्कॉन सर्जिकल अल्ट्रास्कॅन इमॅजिंग) मशिनद्वारे गर्भातील लिंगाचे अगदी स्पष्टपणे निदान होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एबी मशिनद्वारे गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे सहज ओळखता आले. याचा अहवाल आरोग्य विभागाच्या वतीने राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.
पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट १९९४ व २००३ च्या द्वारे सोनोग्राफी मशिनच्या वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक सोनोग्राफी मशिनची आरोग्य विभागाकडे नोंदणी बंधनकारक आहे. तसेच या मशिनद्वारे होणाऱ्या प्रत्येक तपासणीची नोंद ठेवावी लागते. त्या तपासण्यांवर आरोग्य विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जाते. नेत्ररोगतज्ज्ञांच्या एबी स्कॅन मशिनचीही नोंदणी व्हावी यासाठी पुण्याच्या पीसीपीएनडीटी सेलने प्रयत्न केले होते. त्याला नेत्ररोगतज्ज्ञांच्या संघटनेने विरोध करून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे
न्यायालयाने या मशिनची नोंदणी करण्यास तात्पुरती स्थगिती दिली असून, राज्य शासन व महापालिकेला बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर पीसीपीएनडीटी सेलने स्टिंग आॅपरेशन करून एबी स्कॅन मशिनद्वारे लिंगनिदान सहज शक्य असल्याचे उजेडात आणले आहे. राज्य कुटुंब कल्याण संचालनालयाचे अतिरिक्त संचालकांना तातडीने हा अहवाल पाठवून देण्यात आला आहे, उच्च न्यायालयामध्येही याचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.

Web Title: Gender diagnosis by AB scan machine