बंगल्यात गॅस सिलिंडरचा स्फोट
By Admin | Updated: February 6, 2017 05:56 IST2017-02-06T05:56:47+5:302017-02-06T05:56:47+5:30
वालचंदनगर परिसरातील कळंब-चिखली रस्त्यावर एका बंगल्यात स्वयंपाक करीत असताना गॅस गळती झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला.

बंगल्यात गॅस सिलिंडरचा स्फोट
वालचंदनगर : वालचंदनगर परिसरातील कळंब-चिखली रस्त्यावर एका बंगल्यात स्वयंपाक करीत असताना गॅस गळती झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत दोघे परप्रांतीय युवक भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
कळंब - चिखली रस्त्यावर फडतरे पेट्रोलपंपासमोर बापूराव मोहिते यांचा बंगला आहे. या बंगल्यामधील एका खोलीत येथील गॅस एजन्सीमध्ये काम करणारे ५ परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. रविवारी (दि. ५) सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यापैकी दोघे जण स्वयंपाक करीत होते. यामध्ये एक जण भाकरी तयार करत होता. तर दुसरा युवक भाकरी भाजत होता. यावेळी गॅस गळती झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने इतर तिघेजण बाजूला असल्याने थोडक्यात बचावले. मात्र, सिलिंडरच्या स्फोटामुळे या खोलीचा दरवाजा तुटून पडला. खिडकीच्या काचा फुटल्या. खोलीतील गादीसह इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेमध्ये मनीष गोदरा (वय ३५), धन्नाराम गोदरा (वय ३०, रा. मूळ राजस्थान, ता. जोधपूर) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर संपूर्ण परिसर हादरून गेला. स्फोटाची तीव्रता जाणवल्याने या घटनेची माहिती घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.(वार्ताहर)