दौंडच्या भाजी मंडईचा होतोय कचरा डेपो
By Admin | Updated: May 10, 2017 03:47 IST2017-05-10T03:47:03+5:302017-05-10T03:47:03+5:30
दौंड शहराचा विकास केवळ शासकीय जागेअभावी रखडलेला आहे. एकीकडे विकासासाठी शासनाच्या जागा मिळाल्या पाहिजेत

दौंडच्या भाजी मंडईचा होतोय कचरा डेपो
मनोहर बोडखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : दौंड शहराचा विकास केवळ शासकीय जागेअभावी रखडलेला आहे. एकीकडे विकासासाठी शासनाच्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी सातत्याने ओरड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत होत असते; परंतु आहे त्या शासकीय जागेत नगर परिषदेने उभारलेल्या इमारतींची दुरवस्था झाली ती केवळ प्रशासन आणि विशेषत: राजकीय मंडळींच्या उदासीन धोरणामुळे. नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी उभारलेल्या भाजी मंडईचे वाढीव बांधकाम अर्धवट स्वरुपाचे असून खितपत पडलेल्या या जागेत घाणीचे आणि मोकाट जनावरांचे साम्राज्य आहे. तर, इमारतीच्या छताच्या भागाचा स्वच्छतागृह म्हणून सर्रास उघड्यावर वापर होत आहे. प्रामुख्याने याचा उपद्रव व्यापारी आणि शहरातील नागरिकांना होत आहे. दौंडला दररोज आणि आठवड्याचा बाजार एकाच परिसरात भरतो. त्यामुळे मंडईत खरेदीसाठी नागरिकांची दररोज वर्दळ असते.
परंतु, शासनाच्या जागेवर भाजीमंडई वाढीव बांधकाम या आरक्षणावर नगर परिषदेने अनुदान आणि कर्ज घेऊन ३० ते ३५ वर्षांपूर्वी भाजी मंडईची इमारत उभारली असल्याचे समजते. यातील काही गाळे हे बंद स्वरूपात आहेत. काही गाळ्यांमध्ये व्यापार सुरू आहे. तर, हजारो स्क्वेअर फूट बांधकाम अर्धवट स्वरूपात धूळ खात पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यावर मात्र नगर परिषदेचे निर्बंध नाहीत. कचऱ्याबरोबरीने मांजर, कुत्री, मोकाट जनावरांचा संचार असतो; त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात घाणीची दुर्गंधी पसरते. याचा उपद्रव येथील व्यापारी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
परंतु, तोंड दाबून मुक्याचा मार व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. तेव्हा पडीक असलेल्या या जागेतील घाण त्वरित काढण्यात यावी, की जेणेकरून व्यापारी आणि शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल.